Smriti Irani’s Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 To Go Off Air Soon : ‘क्योंकि सास भी कभी बही थी २’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्मृती इराणी यांनी या मालिकेतून टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक केलं. बऱ्याच वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा तुलसीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. परंतु, आता त्यांची ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.
स्मृती इराणी यांच्या या मालिकेत ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या पहिल्या पर्वातील अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत, त्यामुळे ही मालिका पुन्हा सुरू होणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता होती. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ २९ जुलै २०२५ ला प्रदर्शित झाली. प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अशातच आता मालिकेला प्रदर्शित होऊन ३ महिनेच झालेले असताना ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं आहे.
‘क्योंकि सास भी कभी बही थी २’ मधील अभिनेता हितेन तेजवानी याने याबद्दल सांगितलं आहे. या मालिकेत तो करण ही भूमिका साकारत आहे, तसेच मालिकेच्या पहिल्या पर्वाचाही तो भाग होता. ‘इंडिया फोरम्स’शी संवाद साधताना त्याने ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
हितेन याबद्दल म्हणाला, “मला याबद्दल काहीही कल्पना नाहीये, कारण मी नियमितपणे मालिकेचं शूटिंग करत नाहीये. मोजकेच दिवस माझं शूटिंग असतं. जर मी सेटवर असलो असतो तर मला याबद्दल माहिती असली असती. पण, फक्त काहीच दिवस तिथे असल्याने आणि आता पुन्हा यूएसला आल्यामुळे मला याबद्दल काही माहिती नाही की मालिका बंद होणार की नाही.”
हितेनने पुढे सांगितलं की, “जेव्हा मला या मालिकेसाठी फोन आला होता तेव्हा असं सांगण्यात आलेलं की पहिल्या पर्वाप्रमाणे हे परव फार काळ कदाचित सुरू राहणार नाही. ठराविक कालावधीपुरतीच मालिका सुरू राहील, त्यामुळे आता वाहिनीने किंवा प्रॉडक्शन टीमने नेमका काय निर्णय घेतला असेल, याबद्दल मला ठोस माहिती नाहीये.”
