Soham Bandekar : आदेश व सुचित्रा बांदेकर यांना मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून ओळखलं जातं. त्यांचा लेक अभिनेता-निर्माता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वीच सोहमने आपल्या आई-बाबांच्या पावलावर पाऊल टाकत कलाविश्वात पदार्पण केलं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. त्याबरोबरच सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

सोहमच्या लग्नाबद्दल त्याचे चाहते कायमच उत्सुक असतात. त्याला ‘आस्क मी सेशन’मध्ये अनेकदा लग्नासंदर्भातील प्रश्न विचारतात. याशिवाय आदेश व सुचित्रा बांदेकरांना सुद्धा अनेक मुलाखतींमध्ये “सोहम लग्न कधी करणार”, “होणारी सून तुम्हाला कशी पाहिजे” असे प्रश्न विचारले जातात. ‘राजश्री मराठी’ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सोहमची होणारी पत्नी कोण असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. याबाबतची मोठी अपडेट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेत्री पूजा बिरारी बांदेकरांची सून होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

मात्र, या वृत्ताला अद्याप बांदेकर कुटुंबीयांनी दुजोरा दिलेला नाहीत, अथवा याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या केवळ चर्चा आहेत. याशिवाय सोहमने सुद्धा लग्नाबाबतची कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. त्यामुळे या वृत्ताची सत्यता बांदेकर किंवा पूजाने प्रतिक्रिया दिल्यावर स्पष्ट होईल.

राजश्री मराठीने शेअर केलेल्या पोस्टवर पूजा आणि सोहमच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर, काही युजर्सनी, “हे खरं आहे का?” असा प्रश्नही कमेंट्समध्ये विचारला आहे.

दरम्यान, सोहम बांदेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तर पूजा बिरारी ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरी ही प्रमुख भूमिका साकारत आहेत. यापूर्वी ती ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत झळकली होती.