दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर, नवीन गाड्या खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. आता या पाठोपाठ टेलिव्हिजन विश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. तो अभिनेता म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका मंदार जाधव. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मंदारच्या घरी आज नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकेत मंदार जाधव प्रमुख भूमिका साकारत आहे. सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करत अभिनेत्याने त्याच्या सर्व चाहत्यांबरोबर नवीन गाडी घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे.

मंदारच्या बाबांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने या कुटुंबीयांनी नवीन गाडी घेतली आहे. नव्या गाडीच्या स्वागतासाठी संपूर्ण जाधव कुटुंब एकत्र गेलं होतं. मंदारने या फोटोला, ‘मेरे डॅड की मारुती’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच वडिलांना ‘Happy Birthday Papa’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

मंदारने शेअर केलेल्या फॅमिली फोटोमध्ये त्याची पत्नी, मुलं, आई-बाबा यांच्यासह आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे. हा अभिनेता म्हणजेच मंदारचा सख्खा भाऊ मेघन जाधव आहे.

सध्या मेघन ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारत आहे. जयंत या पात्रामुळे मेघन सध्या घराघरांत चर्चेत आला आहे. याशिवाय त्याच्या दमदार अभिनयासाठी नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात सुद्धा त्याला सन्मानित करण्यात आलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी मंदार जाधव अन् त्याच्या कुटुंबीयांना या नव्या गाडीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. मंदारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आजवर त्याने अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलेलं आहे. सध्या अभिनेता ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर रात्री ११ वाजता प्रसारित केली जाते.