Star Pravah New Serial TRP Updates : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर १५ सप्टेंबरला दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. ‘लपंडाव’ ही मालिका दुपारच्या सत्रात सुरू करण्यात आली आहे. तर ‘नशीबवान’ मालिका रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला ऑन एअर होते. या दोन्ही मालिकांकडून प्रेक्षकांना सुरू होण्याआधीच प्रचंड अपेक्षा होत्या. दमदार कलाकार, प्रोमो पाहिल्यावर सर्वत्र निर्माण झालेली उत्सुकता यामुळे या दोन्ही मालिकांना भरघोस प्रतिसाद मिळणार असा अंदाज सर्वत्र आधीच व्यक्त करण्यात आला होता. अखेर या दोन मालिकांचा ओपनिंग टीआरपी वाहिनीने स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘स्टार प्रवाह’वर रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता प्रसारित केली जाते. रुपाली आणि चेतनचं वाहिनीवर कमबॅक तसेच कृतिकाची पहिली मालिका असल्याने याबद्दल सर्वत्र बरीच उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर सरकार, सखी आणि कान्हा यांची गोष्ट पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांना भावली आहे. या मालिकेला दुपारच्या सत्रात आजवरचा सर्वाधिक टीआरपी मिळाला आहे. २.७ रेटिंगसह ही मालिका दुपारच्या सत्रात लॉन्च करण्यात आलेली यशस्वी मालिका ठरली आहे.
‘नशीबवान’ मालिका ठरली स्लॉट लीडर
‘लपंडाव’सह १५ सप्टेंबर रोजी ‘नशीबवान’ मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारेची मुख्य भूमिका आहे. आदिनाथची ही पहिली दैनंदिन मालिका असल्याने सर्वत्र या मालिकेबद्दल कमालीची उत्सुकता होती. तसेच प्राइम टाइमच्या स्लॉटच्या मालिकांमध्ये बरीच स्पर्धा असते. पण, आदिनाथ पहिल्याच आठवड्यात ‘नशीबवान’ ठरला आहे. त्याच्या मालिकेला ३.७ ओपनिंग टीआरपी मिळाला असून ही मालिका ‘स्लॉट लीडर’ ठरली आहे. म्हणजेच इतर वाहिन्यांवर सुरू असलेल्या ९ वाजताच्या मालिकांच्या तुलनेत ‘नशीबवान’ला सर्वाधिक टीआरपी मिळाला आहे.
दोन नव्या मालिकांच्या टीआरपी संदर्भातील पोस्ट ‘स्टार प्रवाह’ने स्वत: सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. आता येत्या काळात सुद्धा हेच रेटिंग कायम ठेवणं किंवा यापेक्षाही जास्त टीआरपी रेटिंग मिळवण्याचं आव्हान या दोन्ही मालिकांच्या टीमसमोर असणार आहे.