Star Pravah New Horror Serial Kajalmaya Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर तुम्हाला एखादं गूढ कथानक पाहायला आवडेल का? अशा आशयाची पोस्ट वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच शेअर करण्यात आली होती. यानंतर ३०० वर्षांनी ‘ती’ परत येतेय असं कॅप्शन देत ‘स्टार प्रवाह’कडून आणखी एक पोस्ट शेअर केली गेली. यामुळे लवकरच वाहिनीवर एक नवीन मालिका सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. अखेर या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘स्टार प्रवाह’वर ‘काजळमाया’ ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या मालिकेचा आशय नेहमीपेक्षा वेगळा आणि थ्रिलर असणार आहे. यात प्रेक्षकांना मेलोड्रामा, कटकारस्थानं यापेक्षा काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. ही हॉरर मालिका असल्याचं पहिल्याच प्रोमोमधून स्पष्ट झालं आहे.

रात्री उशिरा एक तरुण अंधारात जिने चढत असतो. तो आपला मोबाईल पाहत हसत जात असतो इतक्यात मागून त्याला पैंजणांचा आवाज येतो. यामुळे त्याचं लक्ष विचलित होतं आणि तो तिथेच थांबतो. यानंतर तो पटकन जिन्यांवरून खाली डोकावतो पण, तिथे कुणीच उभं नसतं. यानंतर पैंजणांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून तो तसाच वरच्या मजल्यावर चालत जातो. मात्र, हा तरुण वरच्या मजल्याच्या दिशेने चालत गेल्यावर खाली अंधारात एका महिलेची सावली दिसते. आता ही स्त्री नेमकी कोण आहे, ३०० वर्षांचा आणि तिच्या परतण्याचा नेमका संबंध काय? ‘काजळमाया’मध्ये प्रेक्षकांना नेमका काय पाहायला मिळेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील.

‘काजळमाया’च्या प्रोमोमध्ये झळकलेला अभिनेता आहे अक्षय केळकर. अक्षय ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाचा विजेता होता. यानंतर तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या मालिकेत झळकला होता. आता अक्षय ‘काजळमाया’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘काजळमाया’चा पहिलाच प्रोमो थरकाप उडवणारा आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अनेक वर्षांनी काहीतरी खास पाहायला मिळेल असं वाटतंय”, “सासु-सुनेच्या भांडणांपेक्षा हे काहीतरी वेगळं पाहायला नक्की आवडेल”, “आता खरी मजा येणार”, “याला म्हणतात प्रोमो…काय खतरनाक आहे”, “आतापर्यंतची सर्वात हटके संकल्पना वाटतेय” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.