Shubhavivah Fame Actress Kunjika Kalwint Exit From Serial : गेल्या काही दिवसांपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेतील सेकंड लीड अभिनेत्री लवकरच मालिका सोडणार अशा चर्चा सर्वत्र चालू होत्या. मात्र, ती अभिनेत्री नेमकी कोण असेल याबद्दल प्रेक्षकांना काहीच माहिती नव्हती. नुकतीच या अभिनेत्रीने स्वत: पोस्ट शेअर करत मालिकेतून एक्झिट घेतल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय तिने मालिका का सोडली याचं कारणही समोर आलं आहे.

‘स्टार प्रवाह’वर गेली अडीच वर्षे ‘शुभविवाह’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि अभिनेता यशोमन आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय या सिरियलमध्ये अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. ‘शुभविवाह’ मालिकेत पौर्णिमा पटवर्धन ही भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री कुंजिका काळविंटने नुकताच या मालिकेचा निरोप घेतला आहे.

कुंजिकाने स्वत: पोस्ट शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचं डोहाळेजेवण थाटामाटात पार पडलं होतं. लग्नानंतर १० वर्षांनी कुंजिका व निखिल काळविंट आई-बाबा होणार आहेत. यामुळे अभिनेत्रीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कुंजिका लिहिते, “गेल्या ३ वर्षांपासून पौर्णिमा ( Punno ) हे पात्र माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झालं होतं. हे फक्त पात्र नव्हतं…ही माझ्यासाठी एक नवीन ओळख होती. आज पुन्नो म्हणून या मालिकेतील माझा शेवटचा दिवस…अर्थात वाईट वाटतंय पण, हा शेवट नाहीये. आपली भेट पुन्हा होईलच… शुभविवाह या सुंदर मालिकेचा मी भाग होते यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. आज मन खूप भरून आलंय…पण सेटवरच्या आठवणी, सहकलाकारांचं प्रेम मी कायम माझ्याबरोबर ठेवेन. यासाठी मी कायम कृतज्ञ असेन. स्टार प्रवाह, सतिश राजवडे सर आमच्या मालिकेची संपूर्ण टीम…मला ही संधी दिल्याबद्दल मनापासून आभार. तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी नेहमीच आभारी राहीन. याशिवाय या प्रवासात मित्रमंडळी व कुटुंबीयांची सुद्धा खूप मोठी साथ मिळाली. सर्वांप्रती प्रेम व कृतज्ञता…तुमचीच पुन्नो…”

दरम्यान, कुंजिकाने मालिकेतून निरोप घेतल्यावर तिला जवळचे मित्रमंडळी व चाहत्यांनी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता आई होणार असल्याने पुढचे काही महिने अभिनेत्री कलाविश्वापासून दूर असेल. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी पुढचे काही दिवस तुला ऑनस्क्रीनवर आम्ही मिस करू अशाही कमेंट्स या पोस्टवर केल्या आहेत.