Sumona Chakravarti Deleted Instagram Post : टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने दक्षिण मुंबईत मराठा आंदोलकांचा वाईट अनुभव आल्याची पोस्ट केली होती. गाडीच्या बोनेटवर चढून एका आंदोलकाने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या इतर साथीदारांनी जय महाराष्ट्र म्हणत घोषणाबाजी केली, असं सुमोना म्हणाली होती. आता सुमोनाने ही पोस्ट डिलीट केली आहे.
कपिल शर्मा शो फेम सुमोना चक्रवर्तीने रविवारी दुपारी १२.३० वाजता कुलाब्याहून फोर्टला जाताना हा प्रसंग घडल्याचं म्हटलं होतं. हा प्रकार घडला तेव्हा तिथे पोलीस नव्हते. नंतर काही वेळाने पोलीस दिसले ते निवांत बसून गप्पा मारत होते, असंही सुमोना म्हणाली होती. तिने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर सविस्तर पोस्ट टाकली होती. तिची पोस्ट व्हायरल झाली होती, पण आता तिने ती हटवली आहे.
सुमोना चक्रवर्तीची पोस्ट काय होती?
“आज दुपारी १२:३० वाजता मी कुलाब्याहून फोर्टला गाडीने येत होते आणि अचानक जमावाने माझी गाडी अडवली. गळ्यात भगव्या रंगाचा पंचा असलेला एक माणूस माझ्या गाडीच्या बोनेटवर चढला आणि माझ्याकडे पाहून कुत्सित हसला. गाडीच्या बोनेटवर त्याचं वाढलेलं पोट घासत होता. त्याचे इतर साथीदार गाडीच्या खिडक्या ठोठावून “जय महाराष्ट्र!” असे ओरडत होते आणि हसत होते. आम्ही थोडं पुढे गेल्यावर पुन्हा तेच घडलं म्हणजे ५ मिनिटांत दोनदा, हा प्रकार घडला.
पोलीस तिथे नव्हते. (जे पोलीस आम्हाला नंतर दिसले ते निवांत बसून गप्पा मारत होते.) कायदा आणि सुव्यवस्था नाहीच. मला माझ्या गाडीत, दिवसाढवळ्या, दक्षिण मुंबईत – असुरक्षित वाटतंय.
आणि रस्ते? केळीच्या साली, प्लास्टिकच्या बाटल्या, घाणीचे ढीग. फुटपाथवर जागा नाही. आंदोलनाच्या नावाखाली आंदोलक जेवत आहेत, झोपत आहेत, आंघोळ करत आहेत, स्वयंपाक करत आहेत, लघवी करत आहेत, व्हिडीओ कॉल करत आहेत, रील बनवत आहेत, मुंबई दर्शन करत आहेत. सगळे सिव्हिक सेन्सची खिल्ली उडवत आहेत.
मी बरंच आयुष्य मुंबईत घालवलंय. मला इथे खासकरून दक्षिण मुंबईत खूपच सुरक्षित वाटतं. पण आज इतक्या वर्षांत पहिल्यांदाच, माझ्या स्वतःच्या गाडीत असतानाही दिवसाढवळ्या मला खरंच असुरक्षित वाटलं. बरं झालं की माझा एक मित्र माझ्याबरोबर गाडीत होता. जर मी एकटी असते तर काय??? हा विचारही मनात येऊन गेला.
मला व्हिडीओ रेकॉर्ड करायचा होता, पण मग विचार आला की यामुळे ते आणखी भडकू शकतात, त्यामुळे व्हिडीओ रेकॉर्ड केला नाही.
तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही कुठे आहात तरी कायदा आणि सुव्यवस्था काही सेकंदात कोसळू शकते हे लक्षात येतं तेव्हा तो भयंकर अनुभव असतो. शांततेत आंदोलनं होतात, हे आपण पाहिलं आहे. आणि तरीही, पोलीस त्यांच्यावरच कारवाई करतात. पण इथे? पूर्णतः अराजकता माजली आहे,” असं सुमोना म्हणाली होती.
सुमोना चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर तिला पाठिंबा देणाऱ्यांच्या पोस्ट रिपोस्ट केल्या होत्या, त्याही डिलीट केल्या आहेत. त्याचबरोबर आंदोलकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याची पोस्टही हटवली आहे. पोस्ट हटवण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.