Rajeev Sen Charu Asopa together after Divorce : सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन व अभिनेत्री चारू असोपा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. चारू व राजीवचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. पण कधी ते एकमेकांवरील आरोपांमुळे तर कधी परदेशवारीमुळे चर्चेत असतात. आता चारू व राजीव यांची जवळीक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. चारू व राजीव यांनी गणेशोत्सव व दुर्गा पूजा एकत्र साजरी केली.

एकेकाळी एकमेकांवर नको नको ते आरोप करणारे चारू व राजीव एकत्र असल्याचं पाहून चाहते गोंधळले आहेत. चारू व राजीव यांचं नातं आता पूर्वीपेक्षा सुधारलंय, असं त्यांच्या पोस्टमधून दिसतंय. दोघांनी मागील दोन महिने एकत्र घालवले आहेत. आता चारूने एक्स पती राजीव सेनबरोबरच्या वाढत्या जवळीकतेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

चारूने तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये राजीव सेनबरोबर ती वेळ घालवत असल्याने येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल भाष्य केलं. “महत्त्वाचं म्हणजे, मी आनंदी आहे, राजीव आनंदी आहे, जियानाही खूश आहे. प्रत्येकजण आनंदी आहे. सर्वजण एकमेकांशी बोलत आहेत. आम्ही जसे आधी एकत्र होतो, तसेच आहोत. त्यामुळे मी परत त्याच्याबरोबर का आहे, मी त्याला सोडून का गेले याची काळजी करू नका. जे लोक आम्ही काहीही केल्याने नाराज होतात त्यांच्यासाठी मी हे बोलतेय,” असं चारू म्हणाली.

चारू असोपा पुढे म्हणाली, “प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. काहींना एखादी गोष्ट आवडते, तर काहींना दुसरी. पण लोक काय विचार करतात त्याआधारे मी माझे आयुष्य जगू शकत नाही. मला स्वतःचा आणि माझ्या मुलीचा विचार करावा लागतो. त्यानुसार असे निर्णय घ्यावे लागतात जे आम्हा सर्वांसाठी योग्य असतील.” चारूने पुढे ट्रोल करणाऱ्यांना टोला लगावला. “मी करू शकते अशा आणि ज्या गोष्टी मी करू शकत नाही अशा गोष्टींची मला एक यादी करून पाठवा,” असं चारूने म्हटलं.

राजीवबरोबरच्या नात्याची पुष्टी न करता चारू म्हणाली, “आम्ही सर्वजण आनंदी आहोत. तुम्ही सर्वजणही आनंदी राहा. राजीव, जियाना आणि मी गेल्या दोन महिन्यांपासून एकत्र फिरतोय. आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. आम्ही दिल्लीला गेलो, नंतर बँकॉकला, परत दिल्लीला, नंतर चार दिवस बिकानेरला गेलो. तिथे मी माझं काम केलं. मग आम्ही दिल्लीला परत आलो, कोलकात्यात १० दिवस घालवले आणि नंतर मुंबईत एकत्र राहिलो. आम्ही खूप मजा केली, त्याच्या नवीन गाडीत ड्राइव्हवर गेलो. सगळं खूप सुंदर होतं. आता आम्ही परत बिकानेरला आलो आहोत. ही नकारात्मकता कुठून येत आहे? आमच्यात कोणतीही समस्या नाही, पण इतरांना मात्र त्रास होतोय असं दिसतंय. तर फार काळजी करू नका.”

चार वर्षात मोडला चारू-राजीवचा संसार

चारू असोपा व राजीव सेन यांनी २०१९ मध्ये लग्न केलं. २०२१ मध्ये त्यांनी मुलगी जियानाचं स्वागत केलं. मुलीच्या जन्मानंतर दोघांमधील वादाच्या बातम्या येऊ लागल्या. एकमेकांवर गंभीर आरोप करत चारू व राजीव २०२३ मध्ये विभक्त झाले. घटस्फोटानंतरही ते एकमेकांवर आरोप करत होते. पण आता त्यांची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.