TMKOC Fame Actress Shared Casting Experience : हल्ली बऱ्याचदा कलाकार मंडळींना एखाद्या चित्रपट, मालिका किंवा कोणत्याही कलाकृतीसाठी ऑडिशनआधी सोशल मीडियावर फॉलोअर्स किती आहेत असं विचारलं जातं. फॉलोअर्स बघून काम देण्याच्या कास्टिंगबद्दल अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. असंच काहीसं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्रीबरोबरही घडलं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत अंजली मेहता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनयना (Sunayana Fozdar) ने तिच्याबरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं आहे. सुनयनाने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली आहे, यामध्ये तिने सोशल मीडिया आणि त्यावरून केल्या जाणाऱ्या कास्टिंगबद्दल सांगितलं आहे.

फोलोअर्स बघून कास्टिंग करण्याबद्दल सुनयनाची प्रतिक्रिया

सुनयना यावेळी म्हणाली, “कास्टिंगच्या वेळी विचारलं जातं की, तुम्ही तुमची इन्स्टाग्राम आयडी पाठवा. त्यांना तुमच्या ऑडिशनशी काहीही घेणं देणं नसतं. ते म्हणातात, तुम्ही तुमचं इन्स्टाग्राम आयडी पाठवा आम्ही बघतो. मी असं ऐकलंही आहे आणि अनुभवलंही आहे. सुदैवाने माझे अनेक फॉलोअर्स आहेत. पण असं होतं की, इन्स्टाग्राम बघून निवड केली जाते, हे खूप चुकीचं आहे; माझा याला अजिबात पाठिंबा नाहीये.”

सुनयना पुढे म्हणाली, “कारण तुम्ही जे रील बनवताय २०-३० सेकंदांचं ते १५-२० वेळा रीटेक घेऊन शूट केलं जातं. त्यावेळी फक्त लिपस्किंग केली जाते, त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की, ती चांगली रील बनवत आहे तर ती चांगला अभिनय करेल, हे चुकीचं आहे.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “असे खूप कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे, जे सोशल मीडियावर नाहीयेत, ते इन्स्टाग्राम वापरत नाही, ते घरी बसले आहेत.”

अभिनेत्री याबद्दल पुढे म्हणाली, “पण मी असं नाही म्हणणार की, इन्फ्लुएन्सर लोकांनी अभिनय करू नये, कारण आम्हीसुद्धा त्यांच्यासारखं ब्रँडच्या जाहिराती करतो, त्यामुळे जर आम्ही त्यांचं काम करत असू तर त्यांनी आमचं काम का करू नये. तेसुद्धा आम्ही करतो ते काम करू शकतात, आम्ही पण ते करतात तसं काम करू शकतो; पण म्हणून फक्त फॉलोअर्स बघून निवड करणं खूप चुकीचं आहे.”