TMKOC Fame Anjali Talks About The Show : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेली १७ वर्षं हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. परंतु, त्यादरम्यान यामध्ये अनेक कलाकारांची एक्झिट झाली; तर अनेकांची एन्ट्री झाली. अशातच आता यामध्ये अंजली हे पात्र साकारणारी अभिनेत्री सुनयना फौजदारने या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे.

सुनयना यामध्ये अंजली हे लोकप्रिय पात्र साकारत आहे. तिच्याआधी अभिनेत्री नेहा मेहता ही भूमिका साकरत होती. परंतु, नेहाच्या एक्झिटनंतर सुनयना ही भूमिका साकारत आहे. अशातच आता तिनं या मालिकेची ऑफर आली तेव्हा तिच्या घरच्यांना याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, असं म्हटलं आहे.

‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत ती याबद्दल म्हणाली, “मी कधीच कोणाला सांगितलं नव्हतं की, मला हा शो ऑफर झाला आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक आठवडा माझे घरचे मला विचारत होते की, कुठे चाललीयेस वगैरे तेव्हा मी लूक टेस्टला जातेय, असं काहीतरी सांगायचे. कारण- त्या कार्यक्रमाची खूप क्रेझ होती. म्हणून मी ठरवलं की, आधी ऑन एअर जाऊ दे. मग मी सर्वांना सांगेन.”

सुनयनाला पुढे तुमच्या घरीच कार्यक्रमाचे इतके चाहते आहेत. मग त्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळाला असेल ना? असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “हो. इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी कोण नाही का म्हणेल? या कार्यक्रमानं लोकांच्या मनात घर केलं आहे. मी तर स्वत:ला भाग्यशाली समजते की, मला या शोचा भाग होण्याची संधी मिळतेय. कारण- या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की, मलाही खूप प्रेम मिळालं. संपूर्ण टीमनं खूप मेहनत केली आहे.”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून अभिनेते शैलेश लोढा, नेहा मेहता, भव्य गांधी, दिशा वकानी, यांसारख्या अनेक कलाकारंची एक्झिट झाली. त्यानंतर काही नवीन कलाकरांची मालिकेत एन्ट्री झाली. नुकतच काही दिवसांपूर्वी मालिकेत एका नवीन कुटुंबाची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली.