Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Sonalika Joshi: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. हा कार्यक्रम गेली १७ वर्षे प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकारही लोकप्रिय झाले आहेत.
“मी चेन स्मोकर असल्याचे म्हटले होते”
गेली काही आठवडे हा शो टीआरपीच्या शर्यतीतदेखील नंबर एकवर होता. त्याचीही मोठी चर्चा झाल्याचे दिसले. आता मात्र या कार्यक्रमाची नाही तर मालिकेत गेली १७ वर्षे माधवी भाभी या पात्रातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सोनालिका जोशी यांची चर्चा होताना दिसत आहे.
सोनालिका जोशींनी नुकतीच सुभोजित घोष यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की एका फोटोशूटमुळे त्यांच्याबद्दल अनेक चर्चा झाल्या होत्या. फोटोंसाठी अभिनेत्रीने हातात सिगारेट धरली होती. त्यानंतर सोनालिका जोशी चेन स्मोकर आहे, अशा मोठ्या चर्चा झाल्या होत्या, असे अभिनेत्रीने सांगितले.
सोनालिका जोशी म्हणाल्या, “मी फक्त सिगारेट हातात घेतली होती आणि त्या पद्धतीने बसले होते. मी माझ्या आयुष्यात कधीच मद्यपान केले आहे. ती फक्त एक स्टाइल होती. पोज होती. त्यानंतर युट्यूबवर अनेक कमेंट्स आल्या. त्यात काहींनी मी चेन स्मोकर असल्याचे म्हटले होते. मी त्यावेळी विचार केला की जे बोलत आहेत. त्यांना बोलू दे. माझे कुटुंब माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्यांना मी कशी आहे ते माहित आहे. त्यामुळे अशा कमेंट करण्याने काही फरक पडत नाही.”
पुढे त्या म्हणाल्या, “ते फोटोशूट होते. एक वेगळा लूक होता. जर त्यांना ते समजले नाही, तर त्यांना बोलू दे. कदाचित अशा कमेंट करून त्यांना आनंद मिळत असेल. कदाचित त्यांच्या युट्यूब चॅनेलला मोठा फायदा मिळत असेल. त्यातून एकतर त्यांना आनंद मिळत असेल किंवा ते जज करत असतील. त्यांना जज करू दे, असा विचार मी करते.”
‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘मधील भिडे मास्तर आणि माधवी भाभी यांची जोडी चांगलीच गाजली आहे. त्यांच्या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच शोमध्ये भूतनी हा ट्रॅक पाहायला मिळाला. या सिक्वेन्सवेळी शोच्या टीआरपी पहिल्या क्रमांकाला पोहोचली होती. त्यानंतर मंदार चांदवडकर यांनी एका मुलाखतीत शो आणि कलाकारांचे कौतुक केले होते. तसेच प्रेक्षकांचे आभार मानले होते. आता शोमध्ये पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.