TMKOC fame actor: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या मालिकेत जेठा, बापूजी, बबिता, अय्यर, बागा, तारक, सोढी, माधवी भाभी, भिडे, ही आणि मालिकेतील सर्वच पात्रे लोकप्रिय आहेत.
प्रत्येक पात्राची बोलण्याची, वागण्याची एक वेगळी स्टाईल आहे. कोणी समजूतदार आहे, कोणी पटकन रागावणारे आहे, कोणी तार्किक पद्धतीने विचार करते, तर कोणी खळखळून हसवते. या मालिकेतील टपू सेनादेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये हा कलाकार ८ वर्षांनंतर परतणार?
गेल्या काही वर्षात काही कलाकारांनी ही मालिका सोडली होती. त्यामध्ये भव्य गांधीचेदेखील नाव येते. भव्यने मालिकेत टपूची भूमिका साकारली होती. आता भव्य गांधी मोठ्या चर्चेत आला आहे. याचे कारण नेमके काय? हे जाणून घेऊ…
भव्यने २००८ ला या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने ही मालिका साकारली होती. मात्र, जवळजवळ १० वर्षे काम केल्यानंतर अभिनेत्याला या भूमिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. जेव्हा त्याने ही मालिका सोडली, त्यावेळी चाहत्यांना धक्का बसला होता. इतर कोणत्याही कलाकाराला टपूच्या भूमिकेत पाहण्यासाठी कलाकार तयार नव्हते. काही रिपोर्ट्सनुसार त्याने मानधनामुळे हा शो सोडला होता. असेही म्हटले जात होते की, प्रत्येक एपिसोडसाठी त्याला १० हजार रुपये दिले जात होते.
सध्या भव्य गुजराती चित्रपटांमध्ये काम करीत आहे. आता तो तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत परतणार का, यावर त्याने वक्तव्य केले आहे. त्याचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
भव्य गांधीने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले गेले की, तू प्रत्येक एपिसोडसाठी १० हजार रुपये घेत होतास, हे खरे आहे का? त्यावर अभिनेता म्हणाला, “मी कधीच पैशांसाठी काम केले नाही आणि मी पैशांसाठी मालिकादेखील सोडली नाही. मला माहीत नाही की, मला माझ्या कामाचे किती पैसे मिळायचे. कारण- मी लहान होतो. पैशांबाबत सर्व काही आई-वडील पाहायचे. मी त्यांना आजपर्यंत विचारले नाही की, या शोसाठी मला किती पैसे मिळत होते.”
याच मुलाखतीत त्याला विचारले गेले की, तुला पुन्हा या मालिकेत काम करायला आवडेल का? त्यावर भव्य गांधी म्हणाला, “हो. का नाही? मला पुन्हा मालिकेत काम करायला नक्कीच आवडेल.” असित मोदींबद्दल अभिनेता म्हणाला की माझ्यातील टॅलेंट सगळ्यात पहिल्यांदा असित मोदींनी ओळखले होते.
आता भव्य गांधीचे हे विधान ऐकल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आता तो खरंच मालिकेत परतणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सध्या मालिकेत टपू ही भूमिका अभिनेता नितेश बलूनी साकारत आहे.
