Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची किमया करण्याची ताकद, कलाकारांचा अफलातून अभिनय, गुंतून जावे असे कथानक व थोडे ट्विस्ट यांमुळे काही टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज मोठ्या प्रमाणात गाजतात. त्यांपैकी एक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका २००८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तेव्हापासून आतापर्यंत ही मालिका प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे आजही टीआरपीमध्ये इतर मालिकांना मागे टाकण्यात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ला यश येताना दिसते. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. आता याबाबत मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊ…
असित मोदी काय म्हणाले?
असित मोदी यांनी ‘ई-टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत गेल्या काही वर्षांत कलाकारांनी मालिका सोडली. याबाबत ते म्हणाले, “जोपर्यंत कंटेंट आणि कथानक उत्तम आहे. तोपर्यंत कुठल्या कलाकाराने मालिका सोडल्याचा इतका फरक पडत नाही.”
“मी कथानकावर जास्त विश्वास ठेवतो. जोपर्यंत मालिकेचे कथानक उत्तम आहे, तोपर्यंत प्रेक्षक त्यामध्ये गुंतून राहतात. चांगले कथानक असेल, तर सोडून गेलेल्या कलाकारांची प्रेक्षकांना उणीव भासत नाही. शो सध्या बदलला आहे. टप्पू सेना आता मोठी झाली आहे. शोमध्ये आधी जी निरागसता होती, ती आता नाही. पण, कथानक आणि नवीन कलाकार यांमुळे मालिका चांगल्या स्थितीत आहे.
असित मोदी असेही म्हणाले, “ही मालिका फक्त कलाकारांमुळे नाही, तर संपूर्ण टीममुळे यशस्वी ठरली आहे. प्रत्येक पात्राचे एक वेगळे महत्त्व आहे. कलाकार जरी बदलले असतील तरी प्रेक्षक त्या पात्रांवर आजही तसेच प्रेम करतात. कारण- त्या पात्रामध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. ते जसे पूर्वी होते, तसेच आहे.”
दरम्यान, दिशा वाकानी, शैलेश लोढा, नेहा मेहता, भव्य गांधी, निधी भानुशाली अशा काही कलाकारांनी मालिका सोडल्याचे पाहायला मिळाले. सध्या मालिकेत दीलिप जोशी, मंदार चांदवडकर, सोनालिका जोशी हे कलाकार दिसत आहेत.