TMKOC Fame Mandar Chandwadkar’s Wife Shared Their Marriage Story : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम भिडे मास्तर म्हणजेच मंदार चांदवडकर हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांची पत्नी स्नेहल चांदवडकरसुद्धा अभिनेत्री आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असून, अनेकदा रील बनवत असतात. अशातच स्नेहल चांदवडकरने मंदार यांच्याबद्दल तसेच त्यांचं लग्न कसं ठरलं याबद्दल सांगितलं आहे.

स्नेहल चांदडवकरसुद्धा अभिनेत्री असून, सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत काम करत आहे. आता गणेशोत्सवनिमित्त तिने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये स्नेहलने या मालिकेबद्दल, तसेच मंदार यांच्याबद्दलही सांगितलं आहे.

वडिलांनी पत्रिका बघून लग्न ठरवलं – स्नेहल चांदवडकर

मुलाखतीत स्नेहल चांदडवकरला मंदार आणि तुझी ओळख कशी झाली, असं विचारलं होतं. त्यावर स्नेहल म्हणाली, “माझे बाबा ज्योतिषी आहेत आणि त्यांनी माझी व मंदारची पत्रिका पाहिली होती. तेव्हा मी मंदारला पाहिलंही नव्हतं आणि त्याचा फोटोसुद्धा बघितला नव्हता. फक्त पत्रिकेच्या आधारे माझं आणि मंदारचं लग्न झालेलं पण आमच्या दोघांसाठीही ते फायद्याचं ठरलं.”

स्नेहलला पुढे मालिकेत मंदार आणि भिडे यांच्यामध्ये काय फरक आहे याबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावर ती म्हणाली, “भिडे आणि मंदार हे आता छान समीकरण झालेलं आहे. कधी कधी तो घरी आला की, भिडेसारखा वागतो आणि कधी कधी सेटवर मंदारसारखा असतो; पण दोघांमध्ये असा काही फरक नाहीये”.

त्यासह स्नेहलला “फार कमी लोकांना माहीत आहे की, तू त्यांची पत्नी आहेस; पण जेव्हा मालिकेच्या सेटवर कळतं की, तू त्यांची पत्नी आहेस तेव्हा सगळ्यांची काय प्रतिक्रिया असते”, असं विचारलं गेलं होतं. त्याबद्दल ती म्हणाली, “तुम्ही भिडेमास्तरांच्या बायको आहात अशा प्रतिक्रिया असतात लोकांच्या. सेटवर असिस्टंट डिरेक्टर वगैरे उत्सुकतेने विचारतात. मालिकेच्या टीममधील पडद्यामागच्या लोकांना फार आश्चर्य वाटलं आणि माधवी नाहीये का त्यांची बायको वगैरे अशा प्रतिक्रिया मिळाल्या.”

स्नेहलनं ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील भूमिकेबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये ती मंजुषा सावंत म्हणजेच मंजू आत्या ही भूमिका साकारत आहे. त्याबद्दल ती म्हणाली, “मला अशा प्रतिक्रिया मिळतात की, अरे, ही मंजू अशी कशी आहे, हिला बघितलं की राग येतो; पण मी याला पोचपावती समजते. कारण- ते माझं काम आहे.”