Tharala Tar Mag Fame Amit Bhanushali : अलीकडच्या काळात मालिकांचं शूटिंग १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. प्रत्येक मालिकेतील कलाकार सेटवर दिवसरात्र मेहनत घेऊन आपली भूमिका जास्तीत जास्त प्रेक्षकांना कशी आवडेल यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा हे कलाकार सुट्ट्या सुद्धा घेत नाहीत. तर, काहीवेळा कलाकारांना आजारी असूनही कामावर हजर राहावं लागतं.
‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या अडीच वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची मुख्य नायिका जुई गडकरीने आजारपणाच्या कारणास्तव मालिकेतून २ दिवस ब्रेक घेतला होता. यावेळी ‘ठरलं तर मग’मध्ये सायलीला अचानक अटक झाल्याचा सीक्वेन्स दाखवण्यात आला होता. आता सायलीनंतर अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अमित भानुशालीची प्रकृती बिघडली आहे.
अमित भानुशालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रकृतीविषयीची अपडेट दिली आहे. अभिनेत्याने १०२ ताप असूनही ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत शूटिंग पूर्ण केलं आहे. अमित भानुशाली इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहितो, “१०२ ताप आहे… पण, मी हसत-खेळत माझं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय…शेवटी म्हणतात ना शो मस्ट गो ऑन!”
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या मालिकेत अर्जुन आणि सायली एकत्र मिळून साक्षी शिखरेविरोधात पुरावे गोळा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी सायली वेश बदलून साक्षीच्या घरी पोहोचली आहे. मधुभाऊंना काहीही करून निर्दोष मुक्त करायचं हेच अर्जुनचं ध्येय असतं.
‘ठरलं तर मग’ मालिकेत अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्यासह प्रियांका तेंडोलकर ( प्रिया ), प्राजक्ता कुलकर्णी ( कल्पना ), सागर तळाशीकर ( रविराज किल्लेदार ), शिल्पा नवलकर ( प्रतिमा ), मोनिका दबाडे ( अस्मिता ), केतकी पालव ( साक्षी शिखरे ) या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम अग्रस्थानी असते.