Tharala Tar Mag 30 July Episode Updates : ‘ठरलं तर मग’ मालिकेत वात्सल्य आश्रम केसचा अंतिम निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रेक्षक या ट्विस्टची आतुरतेने वाट पाहत होते. अर्जुनने संपूर्ण तयारी करून आणि कोर्टात ठोस पुरावे सादर करून ऐनवेळी बाजी मारल्याचं मालिकेत पाहायला मिळालं.

साक्षीला दोषी ठरवायचं असेल तर, प्रियाने खरी साक्ष देणं खूप गरजेचं आहे याची पुरेपूर जाणीव अर्जुनला असते. त्यामुळे भर कोर्टात शेवटच्या क्षणी अर्जुन प्रियाची उलट तपासणी करण्यास सुरुवात करतो. विलासचा खून तूच केला आहेस, त्यामुळे खरं काय घडलं होतं ते आताच्या आता सांग असा दबाव तिच्यावर देण्यात येतो. साक्षीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपण का भोगावी हा विचार करून प्रियाचा संयम सुटतो आणि अखेर कोर्टात ती साक्षीच्या विरोधात साक्ष देते.

साक्षीला विलासवर गोळी झाडताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय असं प्रिया सांगते. तिच्या कबुलीनंतर सगळेच हादरतात. याशिवाय रविराज किल्लेदार देखील प्रियाच्या या वागण्याने निराश होतात. यानंतर प्रियाला दामिनी काही प्रश्न विचारते. पण, गेली २ वर्षे मी खोटं बोलले, साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आता शक्य नाही…असं सांगत प्रिया साक्षीनेच गोळी झाडलीये या स्टेटमेंटवर ठाम राहते.

साक्षीची विलासच्या खुनाबद्दल कबुली

पुढे, अर्जुन शेवटचे काही प्रश्न विचारण्यासाठी साक्षीला बोलावतो, खून तुम्ही केलाय हे तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न तो तिला विचारतो. आता प्रियाने कबुली दिल्यावर साक्षीकडे नाही म्हणण्याचा पर्यायच उरत नाही. मी या माझ्या हातांनी विलासवर गोळी चालवलीये असं ती भर कोर्टात मान्य करते. याशिवाय विलासला गोळी लागल्यावर मी आश्रमातून निघून गेले आणि त्यानंतर प्रत्येक पुरावा प्रियाने मिटवला. तिनेच पिस्तुलावर मधुभाऊंचे ठसे घेतले असं साक्षी सांगते.

आता आपले मधुभाऊ सुटणार या विचाराने सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. दामिनी क्लोझिंग स्टेटमेंट देताना, साक्षीकडून अनावधानाने गोळी चालवण्यात आली त्यामुळे तिला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करते. पण, अर्जुन त्याचं क्लोजिंग स्टेटमेंट सादर करताना खून करणं, त्यानंतर पुरावे नष्ट करणं हे दोन्ही मोठे गुन्हे असून या दोघींना कठोर शिक्षा द्यावी असं कोर्टात सांगतो.

आता आपल्याला शिक्षा होऊ शकते या विचाराने प्रिया सैरभैर होते. रविराज किल्लेदारांकडे जाऊन बाबा मला वाचवा, मी तुम्हाला सांगणारच होते असं ती म्हणत असते. याशिवाय मधुभाऊंच्या पायाशी लोटांगण घालते. पण, प्रियाच्या खोटेपणामुळे ते आधीच दुखावलेले असतात. त्यामुळे तुझ्या जागेवर जाऊन बस असा इशारा रविराज हातानेच प्रियाला करतात.

साक्षी आणि प्रियाला सुनावण्यात आली ‘ही’ शिक्षा

निकाल जाहीर करताना सर्वप्रथम मधुभाऊंना वात्सल्य आश्रम केसमधून निर्दोष मुक्त करण्यात येतं. यानंतर साक्षीला विलासचा खून केल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. तर, प्रिया सुद्धा या गुन्ह्यात सहभागी असल्यामुळे तिला ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. साक्षी आणि प्रियाला आता अटक करण्यात येणार आहे.

दरम्यान, अर्जुनने वात्सल्य आश्रम केसमध्ये अखेर बाजी मारली आहे. यामुळे तो बायकोचा विश्वास देखील जिंकून घेतो. तर, हरलेली दामिनी रागात उठून कोर्टातून निघून जाते. महिपत शेवटपर्यंत माझ्या लेकीने काहीच केलेलं नाही असं भर कोर्टात आरडाओरडा करून सांगत असतो. पण, त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात.