Tharala Tar Mag 15 & 16 Sep Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नाटकी प्रियावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खरंतर, जेलमध्ये राहायला लागू नये यासाठी प्रिया हे सगळं नाटक करते. पण, आजारपणामुळेच लवकरच तिची काही दिवसांसाठी सुटका होणार आहे. यामुळे प्रिया थेट सुभेदारांच्या घरी येणार आहे.

प्रियाने सुरुवातीपासून अश्विनला आपल्या मुठीत ठेवलेलं असतं. तो सुद्धा बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकत असतो. आता प्रिया जेलमधून बाहेर आल्यावर सर्वात आधी प्रिया तिच्या सासरी म्हणजेच सुभेदारांच्या घरी जाणार आहे. सुभेदार कुटुंबीय यावेळी यंदाचा दसरा कसा साजरा करायचा यावर चर्चा करत असतात आणि इतक्यात घराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रियाची एन्ट्री होते.

सायली म्हणत असते, “आता गणपतीनंतर दसऱ्याची तयारी सुरू केली पाहिजे” इतक्यात दारातून आवाज येतो…’हो! म्हणूनच मी आलेय’ प्रियाला दरवाजात पाहताच सायली भयंकर संतापते. ती लगेच पुढे येते आणि म्हणते, “खबरदार माझ्या घरात पाऊल टाकलंस तर…” एवढंच नव्हे तर प्रियाला सक्त ताकीद देऊन सायली तिला सणसणीत कानाखाली वाजवते. याशिवाय ‘तोंड बंद ठेवायचं’ असा इशाराही तिला देते.

या सगळ्यात अश्विन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रिया या घरची धाकटी सून आहे हे अश्विन सांगणार तोपर्यंत सायली हात दाखवते आणि शांत बसायचं असा इशारा दीराला करते. आता घरातील सगळेच प्रियाच्या विरोधात असल्याने अश्विनला गप्प बसणं भाग असतं.

यानंतर सायली प्रियाला हाताला धरून घराच्या गेटकडे नेते आणि तिला धक्का मारून बाहेर काढते. “कायद्याने तुझी सुटका केली असेल पण, या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही.” कल्पना आणि अस्मिता या दोघी मिळून प्रियाचं सामान गेटबाहेर फेकतात.

सायलीचा हा रुद्रावतार पाहून सगळेच थक्क होतात. येत्या १५ आणि १६ सप्टेंबरला प्रेक्षकांना हा विशेष भाग रात्री ८:३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, आता सायलीने घराबाहेर काढल्यावर प्रिया कुठे राहायला जाणार? किल्लेदार तिला जवळ करणार की ते सुद्धा प्रियाला घराबाहेरचा रस्ता दाखवणार, प्रियाच्या परत येण्याने सायलीचा भूतकाळ अर्जुनसमोर येईल का या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.