Tharla Tar Mag Fame Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मोनिका दबाडेचं डोहाळेजेवण थाटामाटात पार पडलं होतं. ती या मालिकेत अस्मिताची म्हणजेच अर्जुनच्या सख्ख्या बहिणीची भूमिका साकारत आहे. तिच्या डोहाळेजेवणासाठी मालिकेतील सहकलाकार तसेच सेटवरच्या मंडळींनी विशेष तयारी केली होती. यानंतर मोनिकाने सर्वांचे आभार मानत माध्यमांशी संवाद साधताना, पुढील काही महिने मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखेर, सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, ती आनंदाची बातमी अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्वांना सांगितली आहे. मोनिका दबाडे आई झाली असून, तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

मोनिकाच्या घरी ‘१५ मार्च २०२५’ रोजी चिमुकलीचं आगमन झालेलं आहे. अभिनेत्रीने नवरा अन् चिमुकल्या लेकीसह फोटो शेअर करत ही गुडन्यूज सर्वांना दिली आहे. “दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो… गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो… आणि नवे पर्व सुरू १५.०३.२०२५” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून मोनिका व चिन्मय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिजीत खांडकेकर, प्राजक्ता दिघे, अपूर्वा नेमळेकर, प्रियांका तेंडोलकर, अभिषेक राहळकर, समृद्धी केळकर, स्वरदा ठिगळे, अनुष्का पिंपुटकर या सगळ्या कलाकारांनी मोनिकाचं अभिनंदन करत तिच्या गोंडस लेकीचं स्वागत केलं आहे.

दरम्यान, मोनिका दबडे आणि चिन्मय कुलकर्णी यांच्या लग्नाला नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली आहेत. २३ फेब्रुवारीला अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा केला होता. लग्नाच्या वाढदिवशी तिने पतीसाठी खास पोस्ट शेअर केली होती. “आता आपल्या भूमिका बदलणार आहेत पण, मैत्री यापेक्षा घट्ट होईल याची गॅरंटी मात्र आहे. Happy 10th Anniversary Mitra चिन्मय कुलकर्णी” असं अभिनेत्रीने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

मोनिकाचा नवरा काय करतो?

मोनिकाचा पती चिन्मय कुलकर्णीचं छोट्या पडद्याशी खास कनेक्शन आहे. टेलिव्हिजनवरच्या रिॲलिटी शोजचा स्टार लेखक म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या एका Stand Up कॉमेडी शोमध्ये तो सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव’, ‘स्टार प्रवाह ढिंच्यॅक दिवाळी २०२३’, ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमांचं लिखाण चिन्मय कुलकर्णीने केलेलं आहे. यासाठी वाहिनीने त्याचा सन्मान देखील केला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag fame monika dabade blessed with baby girl shares family photo sva 00