Tharla Tar Mag & Gharoghari Matichya Chuli Promo : सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. साक्षी शिखरेला संपूर्ण कोर्टासमोर खोटं सिद्ध केल्यावर मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुनची बाजू वरचढ ठरली आहे. यामुळे महिपत प्रचंड अस्वस्थ होतो. आपल्या लेकीला भर कोर्टात अर्जुनने खोटं ठरवलं याचा राग महिपतच्या मनात असतो आणि याच रागातून तो मधुभाऊंच्या जीवावर उठला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिपत मधुभाऊंना जीवे मारण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे या केसचे सगळे पुरावे सापडेपर्यंत सायली मधुभाऊंना जानकीकडे पाठवण्याचा निर्णय घेते. मधुभाऊंना पुढचे काही दिवस तुझ्याकडे राहायला ठेव, अशी विनंती सायली जानकीला करते. “आम्ही आता मधुभाऊंची काळजी घेऊ, तुम्ही आता फक्त केसकडे लक्ष द्या” असा विश्वास जानकी-हृषिकेश, अर्जुन-सायलीला देतात. मात्र, आता या दोन्ही जोडप्यांच्या वाट्यात एक मोठा अडथळा येणार आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे ऐश्वर्या.

ऐश्वर्या जानकी विरोधात कायम काही ना काही कट-कारस्थानं रचत असते. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या जानकी आणि सायलीच्या मार्गात अडथळा निर्माण करणार आहे.

सायली जानकीला मधुभाऊंची चौकशी करण्यासाठी फोन करते… ती म्हणते, “मधुभाऊंचा फोन लागत नाहीये कुठे आहेत ते?” यानंतर जानकी मधुभाऊंच्या खोलीत जाते पण, ते कुठेही दिसत नाहीत. यामुळे जानकी प्रचंड अस्वस्थ होते. मधुभाऊंच्या काळजीपोटी तिचे डोळे पाणावतात. शोधाशोध केल्यावर अखेर जानकीला मधुभाऊ भेटतात.

जानकी त्यांना सांगते, “अहो मधुभाऊ… तो महिपत तुमच्या जीवावर उठलाय… आता माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी इथून पळून जाऊ नकात.” हे सगळं लपून बसलेली ऐश्वर्या ऐकते. ती जानकी आणि मधुभाऊंचं बोलणं मोबाईलमध्ये शूट करते. ऐश्वर्या मनोमन पुटपुटते, “डॅडांचा मित्र महिमत या मधुभाऊंच्या जीवावर उठलाय. ऐश्वर्या तुला तर लॉटरी लागलीये.”

आता महिपतशी ओळख निघाल्यामुळे, ऐश्वर्या त्याच्याशी हातमिळवणी करून जानकी व सायलीच्या आयुष्यात मोठं संकट आणणार आहे. आता या दोन्ही नायिका मधुभाऊंचं रक्षण कसं करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, हा विशेष भाग १४ मार्चला सायंकाळी ७.३० ते ९ या दीड तासांच्या वेळेत प्रसारित केला जाणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag gharoghari matichya chuli updates janaki request madhubhau villain aishwarya made a cruel plan sva 00