TMKOC Fame Actor’s Ex Wife Talks About Failed Marriage : अनेकदा लग्न मोडलं की त्यासाठी स्त्रियांना दोषी ठरवलं जातं किंवा त्यांनी काहीतरी केलं असेल म्हणूनच हे नातं टिकलं नाही असा लोकांचा समज असतो, असं हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री जुही परमारने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

जुही हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अशातच अभिनेत्री सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘कहानी घर घर की’ या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे. तिने नुकतीच ‘फ्री प्रेस जरनल’ला मुलाखत दिली असून यामध्ये तिने आपल्याकडे लग्न टिकलं नाही किंवा घटस्फोट झाला की, स्त्रियांनाच त्यासाठी जबाबदार धरलं जातं असं म्हटलं आहे. जुही परमारच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्रीने २००९ मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेता सचिन श्रॉफबरोबर लग्न केलेलं. दोघांना समायरा नावाची एक मुलगीसुद्धा आहे. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर या जोडीने २०१८ मध्ये घटस्फोट घेतला.

सचिन श्रॉफच्या दुसऱ्या लग्नाबद्दल एक्स पत्नीने दिलेली प्रतिक्रिया

सचिन श्रॉफने त्यानंतर २०२३ मध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं. त्याने चांदनी कोठीबरोबर लग्नगाठ बांधली. त्यावेळी माध्यमांच्या वृत्तानुसार जुहीने तिला सचिनने दुसरं लग्न केल्याने काहीही फरक पडत नाही, तिला यासाठी त्याला शुभेच्छाही द्यायच्या नाही आणि काही नकारात्मकही बोलायचं नाही. तिला फक्त तिच्या मुलीचं चांगल्या प्रकारे संगोपन करायचं आहे आणि तिची लेक तिच्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे असं म्हटलेलं.

जुहीने मुलाखतीत लग्न मोडलं किंवा घटस्फोट झाला की लोक फक्त स्त्रियांना यासाठी जबाबदार ठरवतात असं सांगत याबद्दलचं तिचं मत व्यक्त केलं आहे. जुही म्हणाली, “हे खूप चुकीचं आहे आणि केवळ शहरांतील लोकच याचा सामना करत आहेत असं नाही. आर्थिक स्वावलंबन वेगवेगळं असू शकतं. ज्या स्त्रिया काम करत नाहीत, त्या अधिक अवलंबून असतात आणि अशा प्रकारच्या अत्याचारांना अधिक बळी पडतात, कारण त्यांच्याकडे पर्यायच नसतो.”

जुही पुढे म्हणाली, “आपल्यासारख्या स्त्रिया ज्या काम करत आहेत, स्वतःसाठी उभं राहू शकतात, आपलं घर चालवू शकतात, त्यांना खेड्यातील स्त्रियाइतका संघर्ष नसला तरीसुद्धा, लोक काय म्हणतील ही भीती कायमच असते; मग ती स्त्री काम करणारी असो वा नसो. कारण – दुर्दैवाने नेहमी चुकीच्या गोष्टींसाठी स्त्रीलाच जबाबदार धरलं जातं. नेहमी तिलाच दोष दिला जातो. एखादं लग्न मोडलं तर लगेच असं म्हटलं जातं की, हिच्याकडूनच काहीतरी चुकलं असणार किंवा हिनेच असं काहीतरी केलं असणार ज्यामुळे हे घडलं.”

अभिनेत्री पुढे मत व्यक्त करत म्हणाली, “नेहमी फक्त स्त्रीलाच का दोष दिला जातो? आणि तिलाही हे माहिती असतं की उद्या काही झालं तरी त्याचा सगळा सामना तिलाच करावा लागेल, म्हणून ती सगळं सहन करत राहते. ती स्वत:वर अन्याय करतेय हे तिला माहित असतं पण तरी ती स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याचं टाळत राहते.”

जुही पुढे याबद्दल म्हणाली, “मला असं वाटतं, एखादं नातं तुटल्यानंतर सोडून जाणाऱ्याला कोणी काही बोलत नाही; पण जी व्यक्ती तिथेच थांबते, मुलांचा सांभाळ करते त्या व्यक्तीलाच खूप काही ऐकवलं जातं. त्यामुळे लोकांनी इतरांप्रती थोडी सहानुभूती दाखवणं गरजेचं आहे, काही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा.”