Tu Hi Re Maza Mitwa Serial Update : स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेला दिवसेंदिवस चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मालिकेत काही दिवसांपासून अर्णव-ईश्वरी यांची मैत्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होती. त्यात दोघांची लव्हस्टोरीसुद्धा सुरू होणार होती; मात्र हे न होता या कथानकात एक वेगळाच ट्विस्ट आला. तो म्हणजे अर्णवचा लावण्याशी साखरपुडा झाला आणि इकडे राकेश-ईश्वरी यांचंसुद्धा लग्न ठरलं.

राकेशच राजेश असल्याचं सत्यही अर्णव समोर आलं आहे. पण अर्णवने आपल्या ताईच्या काळजीपोटी हे सत्य सर्वांपासून लपवून ठेवलं आहे. त्यातच मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागात ईश्वरीचे बाबा आणि अर्णवमध्ये गैरसमजही झाला आहे. त्यामुळे ईश्वरीच्या बाबांनी ईश्वरीला अर्णवबरोबर कुठलाच संवाद साधण्याची तसंच तिला त्याला भेटण्याचीही मनाई केली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या भागात हे दोघे भेटले आणि हे ईश्वरीच्या बाबांना कळलं.

अर्णव-ईश्वरी यांच्या भेटीबद्दल राकेशला माहीत असल्याने त्याने दोघांना अडकवण्यासाठी प्लॅन करत ईश्वरीच्या बाबांपर्यंत ही माहिती पोहोचवली. त्यानंतर ईश्वरीचे बाबा तिथे जाऊन ईश्वरीला घेऊन येतात आणि तिने बाबांचा शब्द पाळला नाही म्हणत नाराजी व्यक्त करतात. मालिकेत एकीकडे राकेशबद्दलचं सत्य समजल्याने त्याचं ईश्वरीबरोबर लग्न होऊ नये म्हणून अर्णव प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे मात्र ईश्वरीच्या घरच्यांना तिचं राकेशबरोबर लवकरात लवकर लग्न व्हावं असं वाटत आहे.

ईश्वरीच्या बाबांच्या मनात आधीच व्हिलन ठरलेला अर्णव अजून व्हिलन वाटावा यासाठी राकेश त्याचे चांगलेच प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच आता तो ईश्वरीच्या बाबांचा अपघात घडवून आणणार असून यात राकेश अडकण्यासाठी त्याने मोठा प्लॅनही केला आहे. ईश्वरीच्या बाबांचा अपघात होऊन या सगळ्यात अर्णवचं नाव यावं म्हणून राकेश अर्णवचे कपडे घालून त्याच्याच गाडीने ईश्वरीच्या बाबांचा अपघात करणार आहे.

मालिकेतील या नव्या ट्विस्टचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात राकेशने अर्णवचं ब्लेझर घालत त्याच्याच गाडीने ईश्वरीच्या बाबांचा अपघात करतो आणि याचा थेट व्हिडीओ ईश्वरीपर्यंत पोहोचतो. या व्हिडीओमधील अर्णवची गाडी पाहून ईश्वरीच्या मनात त्याच्याविषयी संशय निर्माण होतो. आपल्या बाबांचा अपघात अर्णवनेच केला असल्याचं तिला वाटतं.

‘तू ही रे माझा मितवा’ मालिका प्रोमो

बाबांशी उद्धट बोलण्यानं ईश्वरीच्या मनात अर्णवविषयी आधीच राग आहे, त्यात आता त्याने बाबांचा अपघात केल्याचा संशयही तिच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या भागात तिचा हा संशय खरा ठरणार का? यामुळे दोघांच्या मैत्रीवर काय परिणाम होणार? आणि यामुळे मालिकेला काय नवं वळण येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, येत्या ११ ऑगस्ट रोजी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.