Tu Hi Re Majha Mitwa Promo : स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. सुरूवातीपासून मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. मालिकेत नुकताच अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा पार पडला. अर्णवच्या मनाविरुद्ध हा साखरपुडा पार पडला आहे.

अर्णवच्या मनात ईश्वरीविषयी प्रेम आहे; मात्र तो तिला तिच्या भावना सांगू न शकल्यामुळे आणि आजीच्या हट्टापायी त्याने लावण्याशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे त्याचा लावण्याशी साखरपुडा झाला आहे, तर दुसरीकडे ईश्वरी आणि राकेशचाही साखरपुडा पार पडणार होता. पण तो पार पडला नाही. अंजली अचानक आजारी पडल्यामुळे तो साखरपुडा सोडून तिकडे जातो.

गेल्या काही दिवसांपासून अर्णवला त्याचे जिजू म्हणजेच राकेशविषयी संशय येत आहे आणि आता हा संशय खरा ठरणार आहे. लवकरच अर्णवसमोर राकेशचा खरा चेहरा समोर येणार आहे. मालिकेच्या या नव्या ट्विस्टचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जिजूच राकेश असल्याचं अर्णवला कळतं आणि यानंतर तो राकेशवर हल्ला करतो.

मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागात ईश्वरीला साखरपुड्याच्या दिवशी राकेशच्या विचित्र वागणुकीचा संशय आला आहे. तर अर्णवलासुद्धा आधीपासूनच त्याच्या जिजूबद्दल संशय आहे आणि हा संशय खरा ठरवण्यासाठी त्याने राकेशवर पाळत ठेवली आहे. त्यामुळे आता राकेशचं सत्य समोर आणि त्याने बहिणीची फसवणूक केल्यामुळे अर्णवला राग अनावर होतो आणि तो त्यावर हल्ला करत आहे.

अर्णवला राकेशविषयी कळलेलं हे सत्य आता ईश्वरीसमोरही येणार का? हे येत्या भागात कळणार आहे. त्यातच राकेशचा हा खरा चेहरा समोर येताच राजेशिर्के आणि देसाई कुटुंबियांमध्ये काय वातावरण निर्माण होणार? हेही आगामी भागांतून प्रेक्षकांसोर येईल.

दरम्यान, ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेच्या या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनीसुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “खूपच भारी ट्विस्ट”, “आता मालिका बघायला मज्जा येणार”, “या ट्विस्टसाठी खूपच उत्सुक आहे”, “उत्कंठा वाढवणारा प्रोमो”, “अर्णवच्या डोळ्यातली ती आग पुढच्या भागात काहीतरी जबरदस्त होणार याची साक्ष देत आहे” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून प्रेक्षकांनी या नव्या प्रोमोला प्रतिसाद दिला आहे.