Prada Kolhapuri Chappals Row : कोल्हापुरी चपला हा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. इटालियन कंपनी प्राडाने कोल्हापुरी चप्पलेसारखी हुबेहूब उत्पादने स्वत:च्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली आणि मेन्स फॅशन शोमध्ये याचं सादरीकरण करण्यात आलं. या फॅशन शोमध्ये प्रत्येक मॉडेलच्या पायात ‘प्राडा’ने तयार केलेली कोल्हापुरी चप्पल झळकली. प्रसिद्ध भारतीय ​उद्योगपती हर्ष गोयंका यांनी या विरोधात ​सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

‘प्राडा’ कंपनी कोल्हापुरी चपलेसारखी दिसणारी हुबेहूब चप्पल बनवून लाखो रुपयांना विकत आहे. तर, दुसरीकडे आमचे कारागीर तीच चप्पल ४०० रुपयांना बनवतात. जागतिक ब्रँड आपल्या संस्कृतीतून पैसे कमवत असल्याचा त्रास होतो असं गोयंकांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम लोकप्रिय मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी सुद्धा हटके पोस्ट शेअर करत याप्रकरणावर भाष्य केलं आहे. सोशल मीडिया स्टार नागेश होळकर यांच्या रील्स व्हिडीओची नक्कल करत स्वप्नील राजशेखर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेते म्हणतात, “नमस्कार एक गाणं सादर करतो, ‘प्राडानं ढापलं कोल्हापुरी’ चप्पल…आवडल्यास नक्की शेअर करा”

प्राडानं ढापलं कोल्हापुरी चप्पल
दीड लाखात विकलं, हजाराचं चप्पल
हजार वर्षांची परंपरा चोरली
शेकडो कारागिरांच्या टॅलेंटवर डल्ला
आयत्या पिठावर मारल्या रेघोट्या
प्राडानं ढापलं कोल्हापुरी चप्पल
चोर म्हणाला मला दरोडेखोर म्हणा
इंटरनॅशनल मार्केटमध्ये माझा निषेध करा
पैसे कमावतो मी दुसऱ्याचं काम विकून
प्राडानं विकलं दुसऱ्याचं चप्पल

दरम्यान, अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘प्राडा’ कंपनीवर सध्या सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्रात १२ व्या शतकापासून बनवल्या जात आहेत. २०१९ मध्ये भारत सरकारने या चपलांना GI टॅग दिला होता. जेणेकरून या चपला फक्त कोल्हापूरमध्येच बनतील आणि त्यांचं महत्त्व टिकून राहील.