वटपौर्णिमा सणाच्या दिवशी सगळ्या स्त्रिया वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आपल्या खऱ्या आयुष्याप्रमाणे हे सगळे सण टीव्ही मालिकांमध्ये देखील साजरे केले जातात. टेलिव्हिजनवरच्या सगळ्या मालिका या आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक झाल्या आहेत. सुख-दु:ख, सणवार या सगळ्या गोष्टी या मालिकांमध्ये दाखवल्या जातात. आता वटपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मालिकांमध्ये विविध सीक्वेन्स सुरू झाले आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरची लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये नुकताच अक्षराने अधिपतीला प्रेमाची कबुली दिल्याचा ट्रॅक चालू आहे. त्यामुळे यंदाची वटपौर्णिमा ‘अधिक्षरा’साठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. यानिमित्ताने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
अधिपती आणि अक्षरा यांनी नुकतीच त्यांच्या नव्या नात्याला सुरुवात केली आहे. यानिमित्ताने त्यांचं ‘वटपौर्णिमा विशेष गाणं’ प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘नवरा हाच हवा!’ या गाण्यात अक्षरा वडाची पूजा करून अधिपतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळतं. आपल्या लाडक्या मास्तरीण बाईंना पारंपरिक वेशात नटून थटून आलेलं पाहून अधिपती मोहून जातो. सगळ्यांसमोर तो बायकोची दृष्ट काढतो, एवढंच नव्हे तर अक्षरा त्याच्या पाया पडल्यावर अधिपती सुद्धा तिच्या पाया पडतो असं या गाण्यात पाहायला मिळत आहे.
अक्षराने या गाण्यात गडद निळ्या रंगाची अन् त्याला लाल रंगाचा काठ असलेली नऊवारी साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. गळ्यात भरजरी दागिने, केसात गजरा, हातात हिरवा चुडा, मंगळसूत्राचं हटके पेडंट असा लूक तिने या गाण्यासाठी केला होता. तर, अधिपतीने मजंठा रंगाचा अन् त्याला सोनेरी रंगाची किनार असलेला सदरा या गाण्यासाठी खास घातला होता.
“जपून परंपरेला जोडूया दुवा…‘नवरा हाच हवा’…” असे या गाण्याचे बोल आहेत. मास्तरीण बाईंनी त्यांच्या अधिपती रावांसाठी या गाण्यावर एकदम झकास डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिलं असून प्रफुल्ल -स्वप्नील यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. ‘नवरा हाच हवा’ हे गाणं गायिका वेदा नेरुरकरने गायलं आहे. नेटकऱ्यांसह ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचे चाहते सध्या या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd