Bigg Boss Marathi 5 मध्ये सहभागी झालेले स्पर्धक सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. महत्त्वाचे म्हणजे बिग बॉसच्या शोमध्ये असताना जितकी या स्पर्धकांची चर्चा होते, तितकीच चर्चा ते घरातून बाहेर पडल्यावरदेखील होते. आता वैभव चव्हाणने एका मुलाखतीत बिग बॉसमधील त्याच्या खेळावर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला वैभव चव्हाण?

वैभव चव्हाणने नुकतीच ‘२ कटिंग पॉडकास्ट'(2 Cutting Podcast)मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना त्याने म्हटले, “ज्यावेळी मला वैयक्तिक खेळायचं होतं किंवा बी टीमकडून खेळायचं होतं. तेव्हा मला निर्णय घेता आले नाहीत. कारण- त्या टीमचं आधीच ठरलं होतं की, याला बाहेर काढायचं; पण सगळ्यांना कसं सांगणार?” यावर पॉडकास्टच्या होस्टने म्हटले की, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असूनदेखील तुला काही गोष्टी का करता आल्या नाहीत. त्यावर वैभवने म्हटले, “नाही करता आल्या आणि बऱ्याच गोष्टी केल्यादेखील होत्या; पण त्या दाखवण्यात आल्या नाहीत. काही गोष्टींसाठी मी आवाज उठवला, जेव्हा जान्हवी पॅडीदादांशी त्यांच्या करिअरबद्दल बोलत होती. त्यावेळी जान्हवीवर सगळ्यात जास्त चिडणारा मी होतो, जे दाखवलं गेलं नाही. फक्त आर्याचं आणि तिचं संभाषण दाखवलं गेलं. उलट आर्यापेक्षा जास्त मी जान्हवीवर चिडलेलो.”

“त्यानंतर कॉइन गोळा करण्याचा टास्क होता, ज्यामध्ये अभिजीतच्या पायाला लागलं होतं. त्यावेळी बिग बॉसने घोषणा केली की, बदली खेळाडू खेळू शकतो. तिथे मी भांडत होतो की, मला जाऊ दे म्हणून, भांडत होतो की, अभिजीत मी जातो. तर तो पार्ट कट केला. भाऊच्या धक्क्यावर भाऊ म्हटले ना की, तिथे कोणाला तरी संधी होती हीरो बनण्याची. का नाही गेला अभिजीतच्या जागेवर कोण, का कोणी हात वरती नाही केला? तिथे परत भाऊंना इथपर्यंत स्पष्टीकरण दिलं की, भाऊ मी स्वत: भांडत होतो की, मला अभिजीतच्या जागेवर जाऊ द्या. अभिजीतला विचारा तुम्ही.”

हेही वाचा: Bigg Boss Marathi : पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर? एलिमिनेशनची सोशल मीडियावर चर्चा

“सगळं स्पष्टीकरण दिलं आणि आता बाहेर येऊन बघतोय, तर तो पार्टच कट केला आहे. मग लोकांना असंच वाटणार ना की हा शांतच बसतोय, हा काही बोलतच नाही किंवा यानं काही केलंच नाही. त्या गोष्टींचं वाईट वाटतंय की, एकच बाजू दिसलीय फक्त जी की, मी कोणाला तरी उद्धटपणे बोलतोय, भांडतोय, मुलींच्या अंगावर धावून जातोय. ज्या मुलींच्या अंगावर धावून गेलोय, त्यांनापण विचारा की, काय घडलं होतं. आता आर्याबरोबरदेखील एवढी वादावादी झाली. सगळ्यांना दिसतंय की, तिच्याबरोबर एवढी भांडणं झाली. पण, आर्याला आता जरी माझ्याबद्दल विचारलं तरी ती हेच सांगेल की, आम्ही चांगले मित्र आहोत.”

पुढे बोलताना त्याने म्हटले, “भरपूर चुका झालेल्या आहेत. मी म्हणतच नाहीये की, चुकलोच नाही. त्यासाठी मी फक्त प्रेक्षकांची माफीच मागू शकतो.” दरम्यान, बिग बॉस मराठीचे ५ वे पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून, कोणता स्पर्धक ट्रॉफीवर आपले नाव कोरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav chavan expressed displeasure for not showing good things bigg boss marathi 5 riteish deshmukh nsp