Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: समर आणि स्वानंदी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. रोहन व अधिराच्या संसाराला सुरुवात झाली आहे. वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतील या जोडप्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, समर आणि स्वानंदीने त्यांच्या भावंडांसाठी म्हणजेच अधिरा व रोहन यांच्यासाठी एकमेकांशी लग्न केले आहे. समर व स्वानंदीचे लग्न होऊ नये, स्वानंदी राजवाडेंची सून बनू नये यासाठी मल्लिका, अंशुमनने खूप प्रयत्न केले.
स्वानंदीची आई मंदाकिनी हिच्या लोभी स्वभावाचा गैरफायदा घेत, तिला राजवाडेंच्या परंपरागत बांगड्या गहाण ठेवायला सांगितल्या. मंदाकिनीनेदेखील मल्लिकाच्या सांगण्यानुसार त्या बांगड्या सोनाराकडे गहाण ठेवल्या. त्यांच्याकडून पैसे घेतले आणि स्वानंदीला तशाच खोट्या बांगड्या दिल्या. मल्लिकाने हे सर्व भरलग्नात उघड केले. त्यानंतरही समरने स्वानंदीबरोबर लग्नगाठ बांधली.
आता लग्नानंतरही मल्लिका स्वानंदीला त्रास देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आजी सांगतेय की, नवऱ्या मुलाने चूल पेटवायची असते आणि बायकोने प्रसादाचा शिरा बनवायचा असतो. समर आणि स्वानंदी मिळून शिरा बनवीत असल्याचे पाहायला मिळते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, स्वानंदी घरात काम करणाऱ्या रोहिणीला साखर आणायला सांगते. यावेळी मल्लिका बरणीत पिठीसाखरेऐवजी मीठ भरून ठेवते. ती तिच्या मुलीला सांगते की, आज प्रसादात मीठ पडेल. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, ज्या रोहिणीने स्वानंदीला बरणी आणून दिलेली असते. ती किचनमध्ये रडत असते.
“माझ्याकडून एक चूक…”
स्वानंदी तिला रडताना पाहून तिच्याजवळ येते आणि तिला काय झालं, असं विचारते. त्यावर ती सांगते की, माझ्याकडून एक चूक झाली आहे. मगाशी मी तुम्हाला पिठीसाखरेऐवजी मिठाची बरणी दिली होती. ते ऐकून स्वानंदीच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. ती बाहेर येऊन पाहते, तर सर्व जण प्रसाद खात असल्याचे तिला दिसते. त्यानंतर स्वानंदी रडताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘मल्लिका समर-स्वानंदीच्या संसारात टाकू शकेल का मिठाचा खडा?’, अशी कॅप्शन दिली आहे. आता प्रसादाचा शिरा मल्लिकामुळे बिघडणार का, असे झाले, तर स्वानंदी आणि समरमध्ये पुन्हा गैरसमज होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
