Vishakha Subhedar Anniversary : मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा घराघरांत उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा विनोदी कार्यक्रमांतून विशाखाने रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. कलाविश्वात काम करताना कुटुंबीयांची सुद्धा साथ महत्त्वाची असते. विशाखाला या सगळ्या प्रवासात तिच्या पतीने खंबीरपणे पाठिंबा दिला.
आज विशाखा सुभेदारच्या लग्नाचा २७ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने नवऱ्याचं कौतुक केलं आहे. १९९८ मध्ये अभिनेत्रीने महेश सुभेदार यांच्याशी लग्न केलं. खरंतर, लग्नानंतरच तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली आणि यानंतर विशाखाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिचे पती महेश हे सुद्धा अभिनेते आहेत.
विशाखा सुभेदारची पोस्ट
सोबत, साथ, जीवनप्रवासाची २७ वर्षे…! प्रचंड खडतर प्रवास, कधी तू कुठे, मी कुठे… आणि अगदी आजही तेच, पण तरीही तू आहेस आणि मी ही!
ही भावना कायम…!
भांडणं झाली, रुसवेफुगवे, चढउतार, काटकसर, पैसा उधळ त्यावरून वचवच, स्कूटर ते फोर व्हिलर…! सगळंच तुझ्या साथीने…Thank u Mahesh Subhedar सगळ्यासाठी…
एक मात्र प्रांजळपणे कबूल करते कायमच… बायको पुढे जातेय म्हणून कधीही तुझ्यातला पुरुषीअहम जागा होऊ दिलास नाही…नवरा म्हणून मला सपोर्ट केलास, पाठीशी उभा राहिलास. माझी प्रत्येक गोष्ट मी तुला सांगते.. कारण, तू माझा आधी मित्र आहेस आणि नंतर नवरा… बाबा राहूच सोबत मरेपर्यंत..!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मह्या
दरम्यान, विशाखा सुभेदारने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं, झालं तर सध्या ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘शुभविवाह’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.