Wagle Ki Duniya Off Air : छोट्या पडद्यावरील मालिका वर्षानुवर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. सध्याच्या घडीला मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसत आहेत…अशीच एक लोकप्रिय हिंदी मालिका गेली साडेचार वर्षे घराघरांत पाहिली जायची; या मालिकेत सुमीत राघवन, भारती आचरेकर अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती या मालिकेचं नाव होतं ‘वागळे की दुनिया’. या लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

‘वागळे की दुनिया’ ( Wagle Ki Duniya ) या मालिकेचा शेवटचा भाग ९ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसारित करण्यात आला. या कौटुंबिक मालिकेने गेली साडेचार वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. यामध्ये सुमीत राघवन म्हणजेच राजेशच्या लेकीची सखी वागळेची भूमिका अभिनेत्री चिन्मयी साळवी साकारत होती.

मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाल्यावर चिन्मयीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चिन्मयी म्हणते, “आज आमच्या वागळे कुटुंबाबद्दल मी हा खास मेसेज लिहितेय. खरंतर मन भरून आलंय. पण, सर्वप्रथम मला ही संधी दिल्याबद्दल ‘सोनी सब’ वाहिनी आणि आमच्या प्रोडक्शन हाऊसचे खूप खूप आभार. माझा हा प्रवास भरपूर प्रेम आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादांनी परिपूर्ण असा होता.”

चिन्मयी पुढे लिहिते, “या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मला मार्गदर्शन केल्याबद्दल जेडी मजेठिया सरांचे खूप खूप आभार. आज ही चिन्मयी तुमच्यामुळे सर्वांची ‘सखी’ झाली. सुमीत राघवन दादा तुझ्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. परिवा प्रणति सेटवर पहिल्या दिवसापासून मायेने तू माझा हात धरलास, जो शेवटच्या दिवसापर्यंत सोडला नाहीस. सेटवर मला कधी निराश वाटत असेल, मी गोंधळलेली असेन, मला भूक लागलेली असेल किंवा मला एका प्रेमळ मिठीची गरज असेल तेव्हा तू सदैव माझ्याबरोबर होतीस. I love you so much my अन्नदाता. शीहान तुझ्याबद्दल काय सांगू? आपलं नातं आता फक्त कॅमेऱ्यापुरतं राहिलेलं नाहीये. मला तुझी कायम आठवण येईल बाळा. माझी मालिकेतील प्रेमळ आजी भारती आचरेकर आणि माझे मालिकेतील दादाजी अंजन श्रीवास्तव तुम्हा दिग्गजांसह मला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच आहे.”

चिन्मयीने या पोस्टमध्ये पुढे, मालिकेतील सगळे सहकलाकार, पडद्यामागे काम करणारी टीम या सगळ्यांचे आभार मानत प्रेक्षकांचा सखीच्या भूमिकेतून निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत तिला पुढील प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर, मालिकेच्या काही चाहत्यांनी ‘वागळे की दुनिया’चा पुढील सीझन लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला आणा असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.