Will TMKOC fame Bagha quit serial: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत अनेक पात्रे एकाच वेळी पाहायला मिळतात, त्यामुळे प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन होते. गेल्या १७ वर्षांत या मालिकेतील विविध पात्रांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

असित मोदी निर्मित ही मालिका २००८ साली पहिल्यांदा प्रदर्शित झाली. तेव्हापासून आतापर्यंत ही मालिका अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील जेठालाल, चंपक चाचा, मेहता साहब, अंजली भाभी, भिडे मास्तर, माधवी भाभी, हाथी भाई, टप्पू सेना, बाघा, पोपटलाल अशी सगळीच पात्रे लोकप्रिय ठरली आहेत.

मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली तरी आणखी एका वेगळ्याच कारणामुळे ही मालिका मोठ्या चर्चेत असते. गेल्या १७ वर्षांत अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. याबरोबरच काही कलाकारांनी निर्माते असित मोदींवर काही गंभीर आरोपदेखील केले आहेत. जेनिफर मिस्री बन्सीवालने काही दिवसांपूर्वीच एका दिलेल्या मुलाखतीत असित मोदींनी त्रास दिल्याचे सांगितले.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेता तन्मय वेकारिया काय म्हणाला?

आता मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाने ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत मालिका सोडण्याच्या अफवांबद्दल वक्तव्य केले आहे. अभिनेता म्हणाला, “तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडण्याचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र, एक काळ असा होता की मी अभिनय क्षेत्र सोडण्याचा विचार करत होतो.”

“मी एका शोमध्ये काम करत होतो, तो शो अचानक चॅनेलने बंद केला; त्यानंतर मला चार महिने कोणतेही काम मिळाले नाही. त्यावेळी मी अभिनय सोडून ९ ते ५ अशी नोकरी करावी, असा विचार करत होतो. पण, त्यानंतर मला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ‘तारक मेहता’मध्ये असे काही घडले नाही की ही मालिका सोडवी, असा विचार माझ्या मनात कधीही आला नाही; हा खूप सुंदर प्रवास आहे. आम्ही जेव्हा सेटवर असतो, तेव्हा आम्ही खूप मजा करतो. सेटवर खूप सकारात्मक वातावरण असते. दारू मी पित नाही, पण जरी प्यायलो, तरी मी हे म्हणणार नाही की मला ही मालिका सोडायची आहे.”

“मी स्वत:ला नशिबवान समजतो…”

अभिनेत्याने या मालिकेत सुरुवातीला छोट्या भूमिका केल्या. याबद्दल अभिनेता म्हणाला, “मी स्वत:ला नशिबवान समजतो की मी अशा मालिकेचा भाग बनलो, ज्यामध्ये मी सुरुवातीला छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या. बाघाचे पात्र मालिकेत येऊन जवळजवळ १५ वर्षे झाली आहेत. ज्या शोला १७ वर्षे लोकांचे प्रेम मिळत आहे, त्याचा भाग असणे हे खूप खास आहे”, असे म्हणत अभिनेत्याने भावना व्यक्त केल्या.

“जेठालालला पाहिले नाही तर…”

तन्मय असेही म्हणाला, “‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. अलीकडेच २८ जुलैला शोला १७ वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण टीमने हा आनंद साजरा केला. यादरम्यान पत्रकार परिषदही घेतली. हा सर्वात आवडता शो आहे. असे बरेच लोक आहेत जे टीव्हीवर जेठालालला पाहिले नाही तर ते जेवतही नाहीत. शोमधील सर्व पात्रांचा वेगळा चाहता वर्ग आहे. लोकांना शोमधील पात्रे आवडली आहेत आणि १७ वर्षांनंतरही लोक या मालिकेला तसेच प्रेम देत आहेत.

असित मोदींबद्दल अभिनेता काय म्हणाला?

असित मोदींबद्दल अभिनेता म्हणाला की, ते निर्माते असल्यासारखे वागत नाहीत. ते खूप चांगले आहेत. कलाकारांना कोणत्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी ते कायम तयार असतात. ते कायम आम्हाला मदत करतात. मी तर असे मानतो की, मागच्या जन्मात काही पुण्य केले असेल, म्हणूनच या जन्मात तारक मेहतासारख्या शोमध्ये काम करायला मिळाले.

दरम्यान, अभिनेत्याने असेही म्हटले की मालिकेची टीमदेखील उत्तम आहे.