Atisha Naik praises co actress Pooja Birari: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचे खऱ्या आयुष्यात एकमेकांशी कसे बॉण्डिंग असेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता सोशल मीडिया, मुलाखती या माध्यमातून कलाकारांमध्ये असलेले नाते, सेटवर होणारी मजा-मस्ती, एकमेकांबद्दल ते काय विचार करतात, तसेच कोणाची कोणाबरोबर उत्तम मैत्री आहे, हे प्रेक्षकांना पाहायला मिळते.

‘येड लागलं प्रेमाचं’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत विशाल निकम, पूजा बिरारी, नीना कुळकर्णी, अतिशा नाईक असे लोकप्रिय कलाकार काम करताना दिसत आहेत. विशाल हा रायच्या भूमिकेत तर अभिनेत्री पूजा ही मंजिरीच्या भूमिकेत दिसत आहेत. अतिशा नाईक यांनी या मालिकेत शशीकला ही भूमिका साकारली आहे.

मला ते अजिबात आवडत…

आता अतिशा नाईक यांनी एका मुलाखतीत अभिनेत्री पूजा बिरारीचे कौतुक केले आहे. तसेच, तिची कोणती एक गोष्ट आवडत नाही, याबद्दलही वक्तव्य केले आहे. अतिशा नाईक, पूजा बिरारी व विशाल निकम यांनी नुकताच मराठी मनोरंजन विश्व’ या यूट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अतिशा नाईक यांना विचारले की, मंजिरीची कोणती गोष्ट आवडते? यावर अतिशा नाईक म्हणाल्या की, मंजिरीची कोणतीच गोष्ट आवडत नाही. त्यांना विचारले की पूजाची कोणती गोष्ट आवडत नाही? त्यावर अतिशा नाईक म्हणाल्या, “ती खूप हळू व सौम्य आवाजात बोलते. सगळ्यांना सांभाळून बोलते, मला ते अजिबात आवडत नाही. मला वाटतं की स्पष्ट आणि खणखणीत बोललं पाहिजे. तिचा उद्देश खूप चांगला असतो, तर मोठ्याने बोल असं माझं म्हणणं असतं. “

पुढे अतिशा नाईक म्हणाल्या, “तिच्या आवडणाऱ्या खूप गोष्टी आहेत. पाठांतर चोख असतं. तिच्याकडे वक्तशीरपणा आहे.” तसेच सेटवर कोणीही मोबाइलमध्ये गुंतून बसत नाही, असेही त्या म्हणाल्या. “आमच्यातील कोणीही सेटवर मोबाइलमध्ये गुंतून बसत नाही. एकाही कलाकाराचा, दिग्दर्शक, त्यांची टीम, हेअरड्रेसर, टेक्निशिअन, कोणाचाही मोबाइल सेटवर वाजत नाही.”

विशाल निकमबद्दल अभिनेत्री म्हणाल्या, “तो सगळ्या गोष्टींचा भावनिकतेने विचार करतो. त्याच्यामध्ये आपपर भाव नाही. अनोळखी माणसाच्या बाबतीत काही झालं तरी त्याला त्याचा त्रास होतो; तर ते तसं झालं नाही पाहिजे. मदत करावीच, पण तो सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो. त्याची आवडणारी गोष्ट अशी की तो स्वत:ला उत्तम पद्धतीने प्रेझेंट करू शकतो. त्याला माहीत आहे की त्याला काय चांगलं दिसतं, काय दिसत नाही. त्याबाबतीत जितकं आग्रही असायला हवं तितका तो असतो. त्याला त्याचे चांगले व वाईट गुण माहीत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यांशी छान वागतो. तसेच तो आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देतो.”

दरम्यान, याच मुलाखतीत पूजा बिरारी व विशाल निकम यांनीदेखील अतिशा नाईक यांचे कौतुक केले.