Zee Chitra Gaurav Puraskar 2025 : मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. येत्या ८ मार्चला या सोहळ्याचं टेलिव्हिजनवर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यंदा या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेता गौरव मोरेने या शोमध्ये ‘पुष्पा’च्या अवतारात एन्ट्री घेतली होती. यानंतर त्याने केलं पाहूयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा’ सिनेमाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. यंदा या सोहळ्याला त्याने देखील उपस्थिती लावली होती. यावेळी ‘पुष्पा’च्या रुपात एन्ट्री घेतलेल्या गौरव मोरेने श्रेयस तळपदेला सिनेमातील डायलॉग म्हणण्याची विनंती केली.

‘झी चित्र गौरव’ सोहळ्यात स्किट सादर करताना गौरव मोरे ‘पुष्पा’ तर, श्रेया बुगडे ‘श्रीवल्ली’ झाली होती. गौरव श्रेयसला म्हणतो, “एक छोटीशी विनंती आहे सर… श्रीवल्ली गरोदर असल्याने तिला डोहाळे लागलेत. माझ्या बायकोला पुष्पाचा आवाज तुमच्या तोंडून ऐकायचा आहे.” गौरव माईक घेऊन जवळ जाताच श्रेयस खऱ्या आवाजात न बोलता, अगदी वेगळा हास्यास्पद आवाज काढून ‘पुष्पा नाम सुनकर फ्लावर समझे क्या, फायर है मैं’ हा डायलॉग म्हणतो.

श्रेयसचा मजेशीर आवाज ऐकून उपस्थित सगळे पाहुणे, प्रेक्षक हसू लागतात. तर, गौरव अभिनेत्याकडे पाहतच राहतो. श्रेयस म्हणतो, “अरे खरा आवाज असाच होता.” यावर गौरव ‘एक नंबर सर’ असं म्हणतो. पण, मंचावरची श्रीवल्ली, “सर एकदा तुम्ही दिलेल्या आवाजात मला संवाद बोलून दाखवा ना” अशी विनंती श्रेयसला करते.

यानंतर श्रेयस “दम है तो रोक के बता शेखावत…” हा डायलॉग बोलून दाखवतो. अभिनेत्याच्या आवाजाची ताकद, त्याचं कौशल्य पाहून सगळेजण श्रेयसचं कौतुक करतात. श्रेयससाठी टाळ्यांचा कडकडाट करण्यात येतो. यावेळी मंचावर शेखावतच्या रुपात अभिनेता ओंकार भोजने उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट्स करत श्रेयसचं भरभरून कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee chitra gaurav puraskar gaurav more requested to shreyas talpade watch video sva 00