‘झी मराठी’ वाहिनीवर ८ जुलै २०२४ रोजी ‘लाखात एक आमचा दादा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या माध्यमातून नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली. मालिकेत नितीश सूर्या दादा, तर दिशा तुळजा ही भूमिका साकारतेय. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार दिशा परदेशीने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आता तिच्याऐवजी एका नव्या अभिनेत्रीची शोमध्ये एन्ट्री होणार आहे. दिशाने अचानक मालिका सोडली याचं कारण स्वत: स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिशा परदेशी सांगते, “तुळजा’ ही भूमिका साकारताना खूप मजा आली कारण, जशी तुळजा निंबाळकर आहे, तशी खऱ्या आयुष्यात दिशा परदेशी अजिबात नाहीये. तुळजा स्वावलंबी आणि निर्णय घेण्यात परिपूर्ण आहे, त्यामुळे ही भूमिका साकारत असताना एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात यायचा. तुळजाकडून खूप काही शिकायला मिळालं, कारण मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चंचल, खोडकर आहे. पण, तुळजा साकारताना दिशाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवता आली, पण आता इथून पुढे मी तुळजाची भूमिका साकारणार नाहीये. तुळजा या पात्राकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मी कायम लक्षात ठेवणार आहे.”

“सर्वांना प्रश्न पडला असेल की मी ही मालिका का सोडतेय, तर मी म्हणेन… आरोग्याच्या पलीकडे काहीही नाही आणि प्रकृतीच्या कारणामुळेच मला मनात नसूनही हा निर्णय घ्यावा लागत आहे. “लाखात एक आमचा दादा” या मालिकेला मी निरोप देत आहे. मी खूप प्रयत्न केला यातून बाहेर पडण्याचा पण डॉक्टरांच्या सल्ला आहे की मला आरामाची गरज आहे. ही तुळजा साकारण्यासाठी मी आणि मालिकेच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. मला खात्री आहे की, जेवढं प्रेम तुम्ही या तुळजाला दिलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही नवीन तुळजाला द्याल. मी जरी मालिका सोडून जात असले तरीही ही माझीच मालिका आहे असं मी नेहमीच म्हणत राहीन, कारण या प्रवासात मी पहिल्या दिवसापासून जोडली गेली आहे. जरी हा प्रवास इथे थांबला असेल तरी मी ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा सदैव भाग राहीन.” असं सांगत दिशा परदेशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी पुन्हा एकदा लास्ट टाईम तुळजा म्हणून कृतज्ञतेने साइन ऑफ करेन. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम पुढच्या वाटचालीसाठी सोबत राहू दे…आणि ‘लाखात एक आमचा दादा’ दररोज रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहत राहा” असंही अभिनेत्रीने यावेळी सांगितलं.

दरम्यान, आता दिशाच्या एक्झिटनंतर मालिकेत मृण्मयी गोंधळेकरच्या रुपात नवीन तुळजा येणार आहे. यापूर्वी मृण्मयीने ‘स्टार प्रवाह’च्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत राजमा ही भूमिका साकारली होती. आता मृण्मयी तुळजाची मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi disha pardeshi reveals reason behind exit from lakhat ek amcha dada serial sva 00