Gautami Patil Entry In Zee Marathi Serial : अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी छोट्या पडद्यावर एन्ट्री घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘शिवा’ मालिकेत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर झळकल्या होत्या. याशिवाय ‘पारू’ मालिकेत सुरुवातीला भरत जाधव यांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. प्रसिद्ध कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले इन्फ्लुएन्सर्स सुद्धा आता मालिकाविश्वात पदार्पण करताना दिसताहेत.

‘झी मराठी’च्या अशाच एका लोकप्रिय मालिकेत नृत्यांगनेची एन्ट्री होणार आहे. ही नृत्यांगना म्हणजे सर्वत्र लोकप्रिय असलेली ‘सबसे कातिल’ गौतमी पाटील. नृत्यांगना गौतमीने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. रिअ‍ॅलिटी शोनंतर आता गौतमी छोटा पडदा गाजवण्यासाठीही सज्ज झाली आहे. लवकरच ‘झी मराठी’च्या ‘देवमाणूस’ मालिकेत तिची एन्ट्री होणार आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर २ जूनला ‘देवमाणूस-मधला अध्याय’ ही मालिका सुरू झाली. या मालिकेची निर्माती श्वेता शिंदेने गौतमीला मोठी संधी दिली आहे. गौतमीचा महाराष्ट्रभरात चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी तिने गाण्यांचे व्हिडीओ अल्बम, ‘घुंगरू’ सिनेमा आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम केलेलं आहे. मात्र, ‘देवमाणूस’च्या निमित्ताने गौतमी पहिल्यांदाच मालिकेत अभिनय करताना दिसेल.

सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीच्या दृष्टीकोनातून नवनवीन प्रयत्न केले जात आहेत. यामुळेच या मालिकेत गौतमीची एन्ट्री झाल्याच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगल्या आहेत.

‘देवमाणूस’ मालिकेत अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत हिरोच मूळ खलनायक आहे. ‘देवमाणूस’च्या यापूर्वीच्या दोन सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता गौतमीची एन्ट्री झाल्यावर अजित कुमारला ती धडा शिकवणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रात्री १० वाजता प्रसारित केली जाते.

दरम्यान, ३१ ऑगस्ट २०२० मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू झाली होती. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात, त्याचा आदर करतात. पण, तो सर्वांचा कसा फायदा उचलतो याची गोष्ट मालिकेत पाहायला मिळाली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर ‘झी मराठी’ने ‘देवमाणूस २’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. या दुसऱ्या सीझनने १० सप्टेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेता तिसरा सीझन सुरू आहे.