kamali upcoming twist: ‘कमळी’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. कमळीची जिद्दी वृत्ती प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. याबरोबरच मालिकेत सतत येणारे ट्विस्ट यांमुळेदेखील मालिकेत नेमकं पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसते.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे कमळीला तिच्या आईने आणि आजीने लहानाचे मोठे केले. तरुण वयात कमळीचे आई-वडील म्हणजेच राजन आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न केले. त्यांना मुलगी झाली. कामानिमित्त राजन परदेशात गेला. तिथून आल्यानंतर कमळी व गौरीला शहरात नेण्याचे वचन त्याने गौरीच्या वडिलांना आबांना दिले.
मात्र, दरम्यानच्या काळात कामिनीने कमळी व तिच्या आईला मारण्याचा प्रयत्न केला, कारण तिला तिच्या मुलीचे रागिणीचे लग्न राजनशी लावून द्यायचे असते. कामिनीमुळे कमळीच्या आईने तिच्या वडिलांसह तिचे गाव सोडले. दुसऱ्या गावात ती नाव बदलून स्थायिक झाली, त्यामुळे राजन व गौरीची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर कामिनीने संधीचा फायदा घेत रागिणी व राजन यांचे लग्न लावून दिले. त्यांना अनिका ही मुलगी आहे. जिचे अति लाड करण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे जवळजवळ सर्वांशी ती उद्धट वागते.
कमळी मालिकेत काय घडणार?
आता कमळी व अनिका यांच्यात सतत वाद विवाद होताना दिसतात. त्यांच्यात कबड्डी स्पर्धा होणार आहे. अनिका व कमळी या दोघी विरुद्ध संघात आहेत. दुसरीकडे कामिनी गौरीच्या शोधात काही गुंडांसह गावी गेली आहे. तिला गौरीच्या घराचा पत्ता सापडणार आहे. आता या मालिकेचा एक प्रोमो शेअर झाला आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘कमळी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कमळी व अनिकाचा संघ कबड्डीच्या स्पर्धेसाठी तयार झाला आहे, तर दुसरीकडे कामिनीला गौरीचे घर कुठे आहे हे माहीत झाले आहे. कामिनी तिच्याबरोबर असलेल्या गुंडांना सांगते की या घराला पेटवून द्या. हे गौरी ऐकते. ती लपून बसते. त्यानंतर तिचे घर पेटलेले दिसत आहे. गौरीच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे, तर कामिनी विचित्र पद्धतीने हसताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कसा करणार कमळी दुहेरी संकटांचा सामना?”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.