Lakhat Ek Aamcha Dada Serial Off Air : ‘झी मराठी’ वाहिनीवरची लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं सगळं शूटिंग पूर्ण झालं असून, लवकरच याचा शेवटचा भाग सुद्धा ऑन एअर होईल. मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग सुरू असताना सगळेच कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
‘झी मराठी’ वाहिनीवरून लवकरच ऑफ एअर होणाऱ्या मालिकेचं नाव आहे ‘लाखात एक आमचा दादा’. छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये नेहमीच टीआरपीच्या दृष्टीने बदल केले जातात. प्रेक्षकांना कथानकाशी जोडून ठेवण्यासाठी दररोज मालिकांमध्ये विविध ट्विस्ट आणले जातात. तर, याउलट काही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतात. ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांपाठोपाठ आता ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सुद्धा ऑफ एअर होणार आहे.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात ही मालिका प्रसारित करण्यास सुरूवात झाली होती. आता अवघ्या १४ महिन्यांतच सूर्या दादा व कुटुंबीय प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. या मालिकेच्या कथेच्या केंद्रस्थानी होता सूर्या दादा. याची भूमिका साकारली होती ‘लागिरं झालं जी’ फेम लोकप्रिय अभिनेता नितीश चव्हाण याने…सूर्या दादा तुळजा आणि आपल्या चार बहिणींची कशी काळजी घेतो हे या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळालं.
मालिकेचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं असून, यामधील सगळे कलाकार एकत्र फिरायला गेले आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं एकमेकांशी खूपच छान बॉण्डिंग आहे. त्यामुळे मालिका संपल्यावर ‘लाखात एक आमचा दादा’ची टीम गेल्या काही दिवसांपासून गोवा-गोकर्ण याठिकाणी भ्रमंती करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
गोवा-गोकर्णचे सुंदर फोटो महेश जाधवने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या टीमने गोव्यात जुई तनपुरेचा वाढदिवस सुद्धा साजरा केला. या फोटोंना महेशने,”जो किताबों में ना मिलें दोस्तोँ, ऐसी दास्ताँ हैं हम!!” असं कॅप्शन दिलं आहे. चाहत्यांनी सुद्धा कलाकारांनी शेअर केलेल्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.