Lakshmi Niwas upcoming twist: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जान्हवी काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. तिच्या आयुष्यात मोठे चढ-उतार आल्याचे पाहायला मिळाले. जयंतच्या त्रासाला कंटाळून तिने त्याच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय घेतला.

जयंत व जान्हवी गोव्याला फिरायला गेले असताना जान्हवीने जयंतसमोरच समुद्रात उडी मारली. त्याने तसेच पोलिसांनी जान्हवीचा शोध घेतला; पण त्यांना जान्हवी सापडली नाही. त्यामुळे जयंतने जान्हवीच्या घरी सर्वांना तिचा मृत्यू झाला आहे, असे सांगितले. या बातमीमुळे जान्हवीच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. हळूहळू सर्वांनी जान्हवीचा मृत्यू झाला आहे हे स्वीकारण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे जान्हवी मात्र किनाऱ्यावर येऊन पडली होती. त्यावेळी तिची भेट विश्वाच्या वडिलांबरोबर झाली. तिने विश्वाच्या वडिलांचा अपघात होण्यापासून वाचवले. विश्वाचे वडील तिला घरी घेऊन आले. मात्र, पुन्हा जयंतच्या जाळ्यात अडकू नये यासाठी जान्हवीने स्वत:चे नाव, ओळख सर्वांपासून लपवली. तिने स्वत:चे नाव तनुजा, असे सांगितले आहे आणि विश्वाच्या घरी तनुजा म्हणून राहत आहे.

भावनाला पाहताच जान्हवी होणार भावुक

आता भावना व तिची भेट होणार का, असा प्रश्न मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना पडला आहे. झी मराठी वाहिनीने लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की भावना विश्वाच्या घरी आली आहे. तितक्यात जान्हवी तिच्या मागून येते आणि विश्वाच्या आईला सांगते, “काकू ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितलं आहे”, विश्वाची आई भावनाला ड्रायव्हर गाडी काढतोय, हे सांगते. हे ऐकल्यानंतर भावना त्यांच्याकडे वळून त्यांना हसून प्रतिसाद देते. त्यावेळी जान्हवीला भावनाचा चेहरा दिसतो.

जान्हवी, भावना ताई? असे हळू आवाजात म्हणते. भावनाला पाहून जान्हवी भावूक होते. ती हळूच भावनाच्या पाठीमागे येते. हातातील रुमाल खाली टाकते आणि तो उचलण्याच्या निमित्ताने ती भावनाच्या पाया पडते व ती तिथून पटकन निघून जाते. भावनाला पायाला स्पर्श झाल्याची जाणीव होते. ती मागे पाहते; पण तिला कोणी दिसत नाही.

आता हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “नियती जान्हवी आणि भावनाची भेट घडवणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

आता जान्हवी जिवंत असल्याचे सत्य कोणासमोर येणार, मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्याबरोबरच मालिकेत व्येंकीला अटक झाली आहे. त्याला सिद्धू व भावना कसे सोडवणार? व्येंकी तुरुंगात असल्याचे सत्य श्रीनिवास व लक्ष्मीला कधी समजणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.