Tarini Zee Marathi New Serial : अभिनेत्री शिवानी सोनारची मुख्य भूमिका असलेली ‘तारिणी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील तारिणी ही स्पेशल क्राइम युनिट ऑफिसर असते. कुटुंबासह ती या मालिकेत सामाजिक जबाबदारीही निभावताना दिसेल. तिचा अनोखा प्रवास प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळेल. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना शिवानी सोनारचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला होता. तिचा लूकही सर्वांच्या पसंतीस उतरला होता. ही नवीन मालिका केव्हा प्रसारित होणार जाणून घेऊयात…

दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सर्वांचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या ‘तारिणी’ची गोष्ट या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शिवानीसह या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका अभिनेता स्वराज नागरगोजे साकारणार आहे. यापूर्वी या अभिनेत्याने ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत काम केलेलं आहे. याशिवाय ‘लेक असावी तर अशी’ या सिनेमात सुद्धा तो झळकला आहे.

शिवानी आणि स्वराज यांच्यासह या मालिकेत दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल. अभिज्ञा भावे, सुवेधा देसाई, आरती वडगबाळकर, नियती राजवाडे, रुपाली मांगले, निकिता झेपाले, अंजली कदम, पंकज चेंबूरकर, ज्येष्ठ अभिनेत्री रागिणी सामंत असे बरेच कलाकार यामध्ये झळकणार आहेत.

शिवानी सोनारची ही मल्टिस्टारर मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर वाहिनीने नव्या मालिकेचा मुहूर्त जाहीर केला आहे. शिवानीची ही नवीन मालिका ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाईल.

आता नवीन मालिका सुरू झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवानीच्या मालिकेला ९:३० चा स्लॉट देण्यात आला आहे. सध्या या वेळेला ‘शिवा’ ही मालिका प्रसारित होतेय. ‘शिवा’ मालिकेचं सध्याचं कथानक पाहता ही मालिका ऑफ एअर होण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी ‘शिवा’ची वेळ बदलली जाण्याची दाट शक्यता आहे.