Megha Dhade on Prapti Redkar: ‘सावळ्याची जणू सावली’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत प्राप्ती रेडकर प्रमुख भूमिकेत दिसत आहे. सावली ही भूमिका तिने साकारली आहे. तसेच अभिनेत्री मेघा धाडे या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसत आहे.

“मी आणि तारा…”

आता नुकतीच प्राप्ती रेडकर आणि मेघा धाडे यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बॉण्डिंगबाबत सांगितले. प्राप्तीला विचारले की, सेटवर मेघा तिला ओरडते का? यावर प्राप्ती म्हणाली, “मी आणि तारा तिच्याबरोबर असतो. ती आम्हाला ओरडते; पण आम्ही कधीच त्याचे वाईट वाटून घेत नाही. कारण- आम्हाला माहीत आहे की, ते आमच्या चांगल्यासाठी आहे. त्यामुळे ती जे काही बोलेल, ती आमच्यासाठी पूर्व दिशा आहे.”

मेघाला विचारण्यात आले की, त्यांच्यावर ओरडण्याची वेळ येते का? आणि मुली तुझं ऐकतात का? त्यावर मेघा म्हणाली, “त्या कधी स्वत:ची काळजी घेत नसल्या की, मी त्यांना ओरडते. प्राप्ती खूप काम करते, स्वत:कडे लक्ष देत नाही. तर मी तिला सांगत असते की, स्वत:कडेही लक्ष दे, त्वचेची, केसांची काळजी घे. त्यानंतर मी त्यांना हेदेखील सांगते की, या कामावरच समाधानी व्हायचं नाही.

“हिरोईनच्या एक-दोन भूमिका मिळाल्या म्हणून हुरळून जायचे नाही. खूप पुढे जायचं आहे. मोठं ध्येय गाठायचं आहे. त्यांचं हे वय समाधानी होण्याचं नाही. माणूस समाधानी झाला की, थांबतो किंवा नाही थांबला तरी त्याची गती कमी होते. आता तर त्यांच्या करिअरची सुरुवात झाली आहे. मलाही खूप काम करायचं आहे. माझंदेखील खूप मोठं करिअर नाही. पण, त्यांच्यासाठी मी मोठी आहे. तर त्यामुळे ती ताईगिरी, भाईगिरी करीत असते. माझं पोरी ऐकतात.”

पुढे अभिनेत्रीने प्राप्ती व भाग्यश्रीबरोबर उत्तम बॉण्डिंग असल्याचे सांगितले. ती म्हणाली की आम्ही तिघी एकमेकींशिवाय या मालिकेत राहाण्याची कल्पना करू शकत नाही. आम्ही आमच्या मेकअप रुमला आमचे घर बनवले आहे. मालिकेतील माझा उत्साह या दोन मुलींमुळे टिकला आहे.

दरम्यान, सावळ्याची जणू सावली मालिकेत अनेक गोष्टी घडताना दिसत आहे. सावली व सांरगच्या आयुष्यात शिवानीमुळे संकट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.