Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील सतत काहीतरी नवीन घडताना दिसते. या मालिकेतील सावली, सारंग, जगन्नाथ, तिलोत्तमा अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

सावली ही गरीब घरची, सावळ्या रंगाची मुलगी आहे. तिचे लग्न अशा घरातील मुलाशी होते, जिथे गोऱ्या रंगाला मोठ्या प्रमाणात महत्व दिले जाते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत सावलीला खूप त्रास सहन करावा लागला. मात्र, हळूहळू तिने सर्वांची मने जिंकली.

तिलोत्तमाने सावलीला अजूनही स्वीकारले नसले तरी ती पूर्वीप्रमाणे तिच्याशी कठोरपणे वागत नाहीत. तिच्यामध्ये काही बदल झाल्याचे पाहायला मिळते. ऐश्वर्या मात्र सावलीला त्रास देण्यासाठी, तिला घरातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते. आता तिने ताराला हाताशी धरुन सावलीच्या विरुद्ध कट कारस्थान करत असल्याचे पाहायला मिळते.

या सगळ्यात सावलीने ती तारासाठी गाणे गाते, ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. सारंगलासुद्धा हे तिचे गुपित माहित नाही. गायिका म्हणून त्याला ताराचा आवाज आवडतो. त्याला माहित नाही की त्याला जो आवाज आवडतो, तो सावलीचा आहे. आता मात्र, सावलीचे हे सत्य सर्वांसमोर येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.

सावली सारंगला तिचे सत्य सांगणार

झी मराठी वाहिनीने सावळ्याची जणू सावली मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सावली व सारंग दोघेही नशेत आहेत. सावली सांरगला म्हणते , तुम्हाला माहित आहे का? मी तुमच्यापेक्षा भारी गाऊ शकते. त्यानंतर सावली गाणे म्हणत असल्याचे पाहायला मिळते. सावली गाणे म्हणत असताना सारंगला ताराचे गाणे आठवते. तो संभ्रमात पडतो. तो मनातल्या मनात म्हणतो, हा आवाज कोणाचा आहे? कोण गात आहे? सावली इतकं चांगलं गात आहे?

हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने सारंग सावलीचा आवाज ओळखू शकेल का? अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, सारंग व सावली आणि सोहम व तारा हे हनिमूनसाठी गेले आहेत. पण, तिथेही तारा सावली व सारंग एकत्र येऊ नयेत, म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे. आता मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.