Savalyachi Janu Savali upcoming twist: कोणी कितीही अपमान केला, वाईट बोलले तरी आपल्या वागणुकीतून, प्रेमळ स्वभावाने इतरांची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत असलेली सावली प्रेक्षकांची लाडकी आहे.

तिलोत्तमाला सुरुवातीला सावली सून म्हणून मान्य नव्हती. तिने ऐश्वर्यासह अनेक कट-कारस्थाने करीत तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता सावलीबद्दलचे तिचे मत मवाळ झाल्याचे दिसत आहे.

“आता हे वादळ तुझ्या घरात…”

काही दिवसांपूर्वीच सारंग व सावलीच्या आयुष्यात शिवानीची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. ती सारंग व सावलीच्या आयुष्यात संकट बनून आल्याचे दिसत आहे. आता मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावली तुळशीची पूजा करीत आहे. तिच्यासमोर ती हात जोडून नमस्कार करते. तितक्यात दिव्याची वात जात असल्याचे तिला दिसते. सावली तो दिवा विझू नये म्हणून प्रयत्न करते.

तितक्यात एक जोगतीण तिथे येते. ती सावलीला म्हणते, आता जसा तू तो दिवा वाचवला आहेस, तसा तुला तुझा संसार वाचवायचा आहे. तुझ्या भक्तीत खूप ताकद होती. म्हणून हे वादळ घराबाहेर थांबलं होतं. आता हे वादळ तुझ्या घरात, चार भिंतींत खेळायला लागलं आहे. सरस्वतीलासुद्धा वेळेनुसार दुर्गा व्हावं लागलं होतं. तसंच तुला तुझ्या संसारात दुर्गा व्हावं लागेल. सावध राहा. त्यानंतर सावली जोगतिणीच्या पाया पडते आणि तिचा आशीर्वाद घेते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘घरावर येणारे वादळ रोखण्यासाठी सावली घेऊ शकेल का दुर्गेचा अवतार?’, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सारंग व सावली यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. ते एकमेकांचा आदर करतात, एकमेकांची मने जपतात. सावली सावळ्या रंगाची असल्यामुळे तिलोत्तमा, ऐश्वर्या यांनी वेळोवेळी तिला त्रास दिला. मात्र, सारंगने रंगाचा विचार न करता, सावलीचे मन बघितले. तिच्या गोड स्वभावाच्या प्रेमात तो पडला.

आता मात्र, शिवानीमुळे त्यांच्या नात्यात दुरावा येणार का, शिवानीचा खरा हेतू सर्वांसमोर कधी येणार, सावलीला शिवानीबद्दल, तिच्या चांगल्या वागण्याच्या खोटेपणाबद्दल कधी समजणार, सारंग तिला या सर्वांत कशी साथ देणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.