Zee Marathi Shiva Serial Off Air : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या ११ ऑगस्टपासून ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. नुकताच या दोन्ही मालिकांचा लॉन्चिंग सोहळा पार पडला. एखाद्या वाहिनीवर जेव्हा नव्या मालिका सुरू होतात, तेव्हा एखादी जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते किंवा काही मालिकांच्या वेळेत बदल केला जातो. ‘झी मराठी’ वाहिनीवरील देखील एका लोकप्रिय मालिकेने ८ ऑगस्टला सर्वांचा निरोप घेतला.
‘झी मराठी’ वाहिनीवर फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘शिवा’ मालिका सुरू झाली होती. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिक प्रमुख भूमिका साकारत होती. आता जवळपास दीड वर्षांनी ‘शिवा’ने सर्वांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यावर या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
‘शिवा’मध्ये अभिनेता शाल्व किंजवडेकर प्रमुख भूमिका साकारत होता. मालिका संपताच शाल्वने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय ‘शिवा’ची भूमिका साकारणाऱ्या पूर्वा कौशिकचं सुद्धा भरभरून कौतुक केलं आहे.
मालिका संपल्यावर शिवाच्या आशुची खास पोस्ट
शाल्व लिहितो, “मारमारी झाली, दुष्टांचा खेळ खलास केला, ड्रामा झाला आणि तीन वेळा लग्न झालं! दीड वर्ष नुसता ‘शिवा’चा छकुला बनून इकडे-तिकडे फिरत तिची साथ देत-देत कधी मालिकेचा निरोप घ्यायची वेळ आली समजलंच नाही! आता या मालिकेचा हँगओव्हर बराच वेळ टिकणार आहे हे नक्की. या प्रवासात खूप काही शिकलो, नवीन मित्र बनवले. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत राहिले. मालिकेमध्ये हिरो नसून हिरोईनच्या भूमिकेत काम करायचा हा पहिलाच अनुभव. जोक्स अपार्ट, मालिकेमध्ये आमची ‘शिवा’च हिरो होती आणि हिरोईन सुद्धा तिच होती. तिचा प्रवास बघताना आणि त्याचा भाग बनून तिला सपोर्ट करताना खूप मजा आली. ‘झी मराठी’वरील सर्व मालिका, एका पारंपारिक हिरोईनची चौकट मोडून एक वेगळा प्रयोग सादर करत आहेत आणि अशा मालिकेत काम करायची संधी मिळाली, खूप लकी आहे मी! आता आशुतोष छकुला देसाई म्हणून निरोप घेतो…भेटतच राहुया नवीन काहीतरी घेऊन येतो, तोवर बाय बाय.”
दरम्यान, शाल्वच्या पोस्टवर पूर्वाने, “कमाल कॅप्शन” अशी कमेंट करत लव्ह इमोजी दिले आहेत. याशिवाय अन्य कलाकार व चाहत्यांनी देखील शाल्वच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव करत त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.