छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. काही वेळा मालिकांमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्री होतात, तर अनेकदा काही जुन्या कलाकारांना कथानकात आलेल्या ट्विस्टनुसार किंवा वैयक्तिक कारणास्तव मालिका सोडाव्या लागतात. काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’मधून मुख्य नायिका दिशा परदेशीने एक्झिट घेतली होती. आता या पाठोपाठ या मालिकेतून आणखी एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत शालनला जालिंदरने उंच कड्यावरून खाली ढकलून दिल्याचा सीन पाहायला मिळाला. यामध्ये शालनचा मृत्यू होतो. खरंतर, जालिंदर ( डॅडी ) सूर्याची फसवणूक करत असल्याचं सत्य शालनला समजतं. यानंतर ती या सगळ्या गोष्टी सूर्याला जाऊन सांगण्याचा निर्णय घेते. जालिंदर सुरुवातील गोड बोलून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो पण, शालन काही केल्या ऐकत नाही आणि शेवटी तिला जालिंदर उंचावरून खाली ढकलतो.

मालिकेत हा सीन कसा शूट करण्यात आला याची झलक शालनने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. शालनची भूमिका अभिनेत्री सुमेधा दातारने साकारली होती. वाईजवळच्या कड्यावर या सीनचं शूटिंग करण्यात आलं आहे. आता कथानकानुसार शालनचा ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत मृत्यू झाल्याने सुमेधा दातारची या मालिकेतून एक्झिट झाली आहे.

सुमेधा दातारची पोस्ट

आपुले मरण पाहिले म्या डोळा
आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाला सोहळा अनुपम्य
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या ओळी स्मरल्या

शालनच्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी-ज्यांनी साथ दिली, सहकार्य केलं, प्रेम आपुलकी दिली त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! शालन कथेत संपली असली तरी प्रेक्षकांच्या मनात कायम राहील. स्नेह आहेच… तो वृद्धिंगत व्हावा…

जेव्हा कोणताही अपघाती किंवा मृत्यूचा सीन शूट केला जातो तेव्हा त्या कलाकाराची किंवा आर्टिस्टची श्रीफळ ओवाळून दृष्ट काढली जाते…थँक्यू

सुमेधा दातारची पोस्ट

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून सुमेधा दातारची एक्झिट झाल्यावर चाहत्यांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी,
“तू फारच सुंदर अभिनय केलास”, “आम्ही तुला मिस करू”, “तुम्ही सगळ्याच भूमिका छान करता”, “तुम्ही अशाच नवनवीन भूमिकांमधून आमच्या भेटीला या” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.