Veen Doghatli Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतील ही तुटेना’ ही मालिका आता प्रेक्षकांच्या मनात हळूहळू जागा निर्माण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे हे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांत दिसत आहेत.
तेजश्रीने स्वानंदी ऊर्फ नंदू ताई तर सुबोध भावे यांनी समर ऊर्फ पिंट्या दादा ही भूमिका साकारली आहे. दोघेही स्वत:च्या कुटुंबावर अतोनात प्रेम करतात. स्वत:च्या भावंडांवर त्यांचा खूप जीव आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. स्वानंदीचा भाऊ रोहन आणि समरची बहीण अधिरा यांचे एकमेकांवर प्रेम आहे, त्यामुळे अधिरा आणि रोहन यांच्या लग्नासाठी स्वानंद व समर यांच्यातील मदभेद विसरून एकत्र आले आहेत.
या सगळ्यात रोहनने ही घोषणा केली, जोपर्यंत त्याच्या मोठ्या बहिणीचे म्हणजे स्वानंदीचे लग्न होत नाही, तोपर्यंत तो लग्न करणार नाही. अधिरा व रोहनच्या लग्नाच्या त्याच्या या अटीमुळे उशीर होऊ शकतो, म्हणून समरने स्वानंदीच्या लग्नाची जबाबदारी घेतली. तसेच तिचे स्वयंवरही रचण्याचा प्रयत्न केला. पण, या सगळ्याला स्वानंदीने विरोध केल्याचे पाहायला मिळाले.
वय वाढले आणि लग्न झाले नाही, म्हणून अनेकदा कधी घरच्यांकडून तर कधी बाहेरच्यांच्या शब्दांमुळे स्वानंदी दुखावली जाते. आता या कारणामुळेच स्वानंदीच्या अश्रूंचा बांध फुटणार असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“लग्न हा इतकाच…”
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की स्वानंदी व तिच्या आईमध्ये बोलणे सुरू आहे. स्वानंदी तिच्या आईला म्हणते, “लग्न हा इतकाच क्रायटेरिया आहे का? सामाजिक जाणिवेतून मी आज वृद्धाश्रमासाठी काम करते. तुमच्या सगळ्यांचं मी सगळं बघते. एनव्हारमेंटल सायन्सची डिग्री घेतली आहे. हे सगळं पाण्यात आहे ना? का? तर माझं लग्न झालेलं नाहीये. स्वत:च्या पायावर उभे राहा. घ्या, राहिलो आम्ही स्वत:च्या पायावर उभ्या. पण, नाही. तुमची मान खालीच आहे. का? तर माझं लग्न झालं नाही.
पुढे स्वानंदी म्हणते, “मलाही संसार करायचा आहे, पण माझं लग्न ठरत नाहीये ना? यात माझा काय दोष?” हे सगळं म्हणताना स्वानंदी एकाच वेळी संतापलेली, उद्विग्न, भावूक अशी दिसत आहे. स्वानंदीचे बोलणे ऐकून तिची आई शेवटी तिला मिठी मारते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लग्न न ठरण्यावरून फुटणार स्वानंदीच्या अश्रूंचा बांध”, अशी कॅप्शन दिली आहे.
तेजश्री प्रधानच्या अभिनयाबद्दल नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तेजश्रीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. “तेजश्री खूप उत्तम अभिनेत्री आहे”, “स्वानंदीचं अगदी बरोबर आहे. मन हेलावून टाकणारा क्षण”, “खूप उत्तम अभिनय. खूप गुणी कलाकार आहेस. तू खऱ्या आयुष्यातसुद्धा अशीच स्ट्राँग राहा”, “खूप छान, अप्रतिम ॲक्टिंग करतेस तेजू”, “सगळ्याच अभिनयात जिंकून टाकतेस अगदी, खूप छान”, “तुझा अभिनय खूप सुंदर आहे.”
“तेजू तू खूप उत्तम अभिनेत्री आहेस, हा सीन तू नेहमीप्रमाणेच खूप सुंदर केलास”, “काय अभिनय आहे! तेजश्री तू उत्तम आहेस”, तुझ्याबद्दल काय बोलावं सुचतच नाही. कोणी इतकं कसं परफेक्ट असू शकतं? तुझ्या परफॉर्मन्सबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे”, अशा अनेक कमेंट्स आहेत. नेटकऱ्यांनी तेजश्रीचे कौतुक केले आहे.
दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.