Kamli Serial Promo : ‘कमळी’ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. यामध्ये विजया बाबर साकारत असलेल्या कमळी या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मालिकेत सध्या कमळी इलेक्शनला उभी राहिल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

कमळी अन्नपूर्णा आजीकडून कॉलेजमधील निवडणुकीत उभं राहावं की नाही याबद्दल सल्ला घेते आणि त्या तिला निवडणुकीसाठी पाठिंबा देतात; तर दुसरीकडे कमळी त्यावेळी घरी आल्याने अन्नपूर्णा आजीला कमळीच त्यांची नात आहे की अनिकाच्या मैत्रिणीमधील कुठली मुलगी त्यांची नात आहे याबद्दल प्रश्न निर्माण झालेला असतो, त्यामुळे त्या अनिकाकडून तिच्या मैत्रिणींची माहिती मागवतात आणि त्यांच्या मोठ्या नातीला शोधण्याचा प्रयत्न करत असतात.

राजन व अन्नपूर्णा या दोघांनाही कमळीच राजन व गौरीची मुलगी असल्याची शंका येते, त्यानुसार ते कमळीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे कामिनी अनिकाने सांगितल्याप्रमाणे कमळीच्या रुममधील फोटो मिळवण्यासाठी तिच्या हॉस्टेलमध्ये जाते असं मालिकेत पाहायला मिळालं.

इलेक्शनसाठी कमळी कंबर कसून उभी

‘कमळी’ मालिकेचा नवीन प्रोमो ‘झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून शेअर केला आहे. या प्रोमोला त्यांनी “इलेक्शनसाठी कमळी कंबर कसून उभी”, अशी कॅप्शन दिली आहे. समोर आलेल्या या प्रोमोमध्ये कमळी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना “तुम्हासनी जर माझे विचार अन् दृष्टिकोन पटत असेल तर आणि तरंच तुमचं मोलाचं मत मला द्या आणि त्याच्या बदल्यात मी कमळी मोहिते तुम्हासनी शब्द देतो की, तुमचे प्रश्न, तुमच्या अडीअडचणी कॉलेजचे मुख्याध्यापक आणि कमिटीसमोर नक्कीच मांडेन.”

कमळी पुढे सर्व विद्यार्थ्यांना म्हणते, “तुमचं बहुमत तुम्ही मला द्याल अशी तुळजाईसमोर प्रार्थना करते.” त्यावेळी कॉलेजमधील सर्व मुली कमळीच्या नावाची घोषणा करतात, तर त्यावेळी तिथे असलेली अनिका मात्र रागाने हे सगळं पहात असते.

‘कमळी’ मालिकेच्या प्रोमोमध्ये पुढे कामिनीला एक माणूस फोन करून “मॅडम ती बाई…” असं म्हणतो, त्यावर कामिनी “दिसली का तुम्हाला ती बाई?” असं विचारते आणि त्यावर तो माणूस हो असं उत्तर देतो. गौरी आडोशाला बसून हे सगळं पहात असते, त्यामुळे आता ‘कमळी’ मालिकेत पुढे नेमकं काय घडणार हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.