Tula Shikvin Changlach Dhada serial: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका चांगलीच गाजली. झी मराठी वाहिनीवर २०२३ ला ही मालिका प्रदर्शित झाली होती. जवळजवळ दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने २०२५ मध्ये निरोप घेतला.

या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. उच्चशिक्षित व शिक्षिका असलेली अक्षरा आणि अशिक्षित अधिपती हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचे पाहायला मिळाले. त्याबरोबरच मालिकेतील भुवनेश्वरी या पात्राचीदेखील मोठी चर्चा झाली. चारुहास, दुर्गेश्वरी या पात्रांनादेखील प्रेक्षकांकडून दाद मिळाली.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका ‘या’ भाषेत झाली प्रदर्शित

या मालिकेत अक्षराच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे दिसली होती. अभिनेता हृषिकेश शेलार अधिपती या भूमिकेत दिसला होता. कविता मेढेकर यांनी भुवनेश्वरी ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गेली अनेक वर्षे नायिकेच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्रीने खलनायिकेची भूमिका साकारल्याने मोठी चर्चा झाली होती. स्वप्नील राजशेखर यांनी चारुहास ही भूमिका साकारली होती. आता ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे नेमके कारण काय आहे, ते जाणून घेऊ…

तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका हिंदीमध्ये डब करण्यात आली आहे. हिंदीमध्ये या मालिकेचे नाव मैं तेरी परछाई, असे आहे. २१ जुलै २०२५ पासून ही मालिका झी टीव्ही वाहिनीवर प्रदर्शित झाली आहे. दुपारी २ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आता मराठी प्रेक्षकांचा या मालिकेला जसा भरभरून प्रतिसाद मिळाला, तसा संपूर्ण देशभरातून या मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याबरोबर झी मराठी वाहिनीवर काही नवीन मालिकादेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान व सुबोध भावे हे लोकप्रिय कलाकार ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच, तारिणी या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनारदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार असल्याचे दिसत आहे. आता कोणत्या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.