चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी कधी काय करतीय याचा नेम नसतो. कधी ते त्यांच्या इवेंटला जाऊन बसतात तर कधी कलाकारांच्या घराबाहेर जाऊन वाट पाहत असतात. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सोबत झाले आहे. वरुण त्यांचा आगामी चित्रपट ‘भेडिया’च्या चित्रीकरणासाठी अरूणाचल प्रदेशमध्ये आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या ठिकाणी त्याच्या चाहत्यांनी झुंबळ घातली होती. त्यानंतर या सगळ्या गोष्टीला वरुणने कसे सांभाळले याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत वरुण गाडीवर चढून त्याच्या चाहत्यांना शांत करताना दिसतोय. “चित्रपटाचं शूटिंग अजून बाकी आहे, त्यामुळे मी आणखी काही वेळ इथेच आहे. म्हणून घाई करू नका आणि आम्हाला शूटिंग पुर्ण करू द्या. शूटिंग संपल्यावर मी तुम्हाला सगळ्यांना नक्की भेटेन” असं वरूण बोलतो तरी देखील वरूणचे चाहते ऐकायला तयार नाहीत. हे आ व्हिडीओत दिसतंय. ते फोनमध्ये त्याचा व्हिडीओ शूट करत किंचाळत आहेत. वरुणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्या नम्रपणाचं कौतुक केलं आहे.
‘भेडिया’ या चित्रपटात वरूणसोबत अभिनेत्री क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘भेडिया’ हा हॉरर चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘स्त्री’ आणि ‘बाला’ या चित्रपटांचे दिग्दर्शक अमर कौशिक करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.