सेलिब्रिटी कलाकार काय बोलतात, याचं आपल्याकडे फार कौतुक आहे. कलाकार वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात, बोलतात याबद्दल जसं कवतिक असतं तसंच ते कुठल्याही मुद्दय़ावर काय मत व्यक्त करतात तेही प्रत्येकाला ऐकायची उत्सुकता असते. अनेकदा चित्रपटांच्या प्रसिद्धीवारीवर असलेल्या आणि देशभर फिरणाऱ्या कलाकारांना त्या-त्या वेळी घडणाऱ्या सामाजिक-राष्ट्रीय मुद्दय़ांवर बोलतं करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. आपल्याकडे अनेक कलाकार असेही बिनधास्त बोल ऐकवणारे असल्याने कित्येकदा मुलाखतीतून बोलतं करण्याची वेळच येत नाही. ते आपल्याला जे वाटतंय ते समाजमाध्यमांवर व्यक्त करून मोकळे होतात. मात्र अनेकदा त्यांच्या तोंडची बोलाची कढी नित्याची झाली असली तरी त्यातून ‘वाद’च निर्माण होतात. अशा कलाकारांना तथाकथित ‘ट्रोल’ अपमानालाही सामोरं जावं लागलं तरी ते बोलायचे थांबत नाहीत. आणि त्यातून वाद रंगणंही बंद होत नाही.. सध्या विद्या बालन तिच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक विधानावरून वादविवादात अडकली आहे.
‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने विद्या बालन देशभर फिरते आहे. आणि या दौऱ्यात अगदी हृतिक-कंगनापासून आत्ताच्या भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाला होणाऱ्या विरोधापर्यंत अनेक मुद्दय़ांवर विद्याला प्रश्न विचारले गेले आहेत. त्यावर तिनेही प्रत्येक प्रश्नाला हातचं न राखता उत्तरं दिली आहेत. आणि त्यातून विनाकारण वादही निर्माण झाले आहेत. ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटासाठी विद्याने बीएसएफच्या जवानांनाही भेट दिली आहे. मात्र सध्या काहीही थेट संदर्भ नसतानाही ती याच जवानांच्या रागाची धनी ठरली आहे. एका कार्यक्रमादरम्यान लैंगिक छळवणूकीबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आले. हॉलीवूडमध्ये निर्माता हार्वे वेन्स्टिन प्रकरण उघडकीस आल्यानंतर हिंदीत संवेदनशील कलाकारांना याविषयी बोलतं करण्याचा प्रयत्न झाला. इरफान खान, नेहा धुपिया, रिचा चढ्ढा अनेकांनी आपली मतं मांडली. याच प्रवाहात विद्यालाही तिचे अनुभव विचारल्यानंतर लैंगिक छळाची व्याप्ती मोठी असल्याचं मत तिने व्यक्त केलं. कित्येकदा फक्त शरीराला स्पर्श केला म्हणजेच लैंगिक छळ होतो असं नाही, हे सांगताना तिने स्वत:चा महाविद्यालयात असतानाचा अनुभव कथन केला. महाविद्यालयात शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर गाडीची वाट बघण्यासाठी उभी असलेल्या विद्याला समोरच एक सैनिक आपल्याकडे टक लावून पाहतोय याची जाणीव झाली. त्याच्या सतत पाहण्यामुळे चिडलेल्या विद्याने तिथल्या तिथे त्याची कानउघाडणीही केली. मात्र अशा प्रकारे पुरुषांचं स्त्रियांच्या शरीराकडे पाहणं हाही लैंगिक छळाचाच भाग आहे हे तिने नमूद केलं. यात विद्याने सांगितलेला सैनिकाचा अनुभव अनेक सैनिकांना जिव्हारी लागला आणि त्यावरून समाजमाध्यमांवर वाद सुरू झाले. खरं तर सैनिकांना लक्ष्य करण्याच्या हेतूने तिने हा अनुभव सांगितला नव्हता, मात्र तरीही तिने जणू सगळ्या सैनिकांवरच टीका केली आहे, अशा पद्धतीने तिच्यावर चहूबाजूंनी प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
कलाकारांच्या विधानांवरून वाद होण्याचे प्रसंग त्यांनाही आणि सर्वसामान्यांनाही नवीन नाहीत. त्यामुळे अनेकदा कलाकार सावधपणे आपली भूमिका मांडतात किंवा मांडतच नाहीत. तरीही त्यांचं कधी तरी सहज बोलून जाणं त्यांना मोठमोठय़ा वादात अडकवून जातं. याचं ठळक उदाहरण सोनू निगमचं देता येईल. भल्या पहाटे होणाऱ्या अजानमुळे झोपमोड होते, असं सांगत प्रार्थना ही वैयक्तिक असायला हवी. मी मुस्लीम नाही तर मी रोज ती अजान का ऐकावी?, अशा आशयाचा मुद्दा त्याने समाजमाध्यमांवरून उपस्थित केला. मात्र तो इतक्या वेगाने सर्वदूर पसरला की, सोनू निगम कसा मुस्लिमद्वेषी आहे याबद्दल देशभर एकच चर्चा सुरू झाली. एवढय़ावरच ते थांबलं नाही या सगळ्या प्रकरणाचा खुलासा त्याला पत्रकार परिषद घेऊन करावा लागला. सोनू निगमबद्दलचा राग इतका होता की त्याचे केस कापणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. मात्र सोनू निगमनेही न डगमगता उलट स्वत:च मुस्लीम न्हाव्याला बोलवून आपलं डोकं भादरून घेतलं आणि त्या न्हाव्यालाच १० लाख रुपये बक्षीस देण्याची मागणीही केली.
कित्येकदा समाजमाध्यमांवरून ट्रोलिंग झालं किंवा निंदानालस्ती झाली म्हणून घाबरणं तर सोडाच उलट आणखी उत्साहाने आपली मतं बिनधास्त व्यक्त करणारे कलाकारही आपल्याकडे कमी नाहीत. ऋषी कपूर हे या अशा वादविवादांचे बादशहा आहेत. राष्ट्रीय-सामाजिक घडामोडींवर ऋषी कपूर आपली सडेतोड मतं व्यक्त करतात. कोणी कितीही टीका केली तरी त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांचे हे बिनधास्त बोल सुरू असतात. कधी तरी खेळीमेळीत भलतंच विधान करण्याचा प्रमादही त्यांच्याकडून घडतो, तर कधी कधी त्यांच्या विधानांचा विपर्यासही केला जातो. महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक सामन्यांमधील सर्वोत्तम कामगिरीला दाद देताना ऋषी कपूर यांनी उत्साहाच्या भरात त्याची तुलना सौरभ गांगुलीच्या विजयाशी केली. २००२ साली इंग्लंडला हरवल्यानंतर कर्णधार सौरभ गांगुलीने ज्या पद्धतीने शर्ट काढून आपला विजयाचा क्षण साजरा केला होता त्या क्षणाची वाट पाहतो आहे, असं ट्विट करत त्यांनी महिला संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. मात्र त्यांच्या या विधानाच शब्दश: अर्थ घेत अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. अभिनेता प्रकाश राज यांनीही पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल सरकारची आणि विशेषत: पंतप्रधान मोदींची जी उदासीनता दिसून आली त्यावर टीका केली. प्रकाश राज यांनाही समाजमाध्यमांवर अपमानजनक बोल ऐकावे लागले. मात्र आपण कलाकार आहोत आणि जे आपल्याला न्याय्य-अन्याय्य दिसते ते स्पष्ट बोललेच पाहिजे या भूमिकेवर ते ठाम राहिले. कंगना राणावत ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बेधडक विधानांमुळे अनेकदा वादात सापडली आहे. मात्र तरीही तिने आपले हे बिनधास्त बोल ऐकवणं थांबवलेलं नाही. बॉलीवूडमधील घराणेशाहीबद्दल तिने करण जोहरला लक्ष्य करत टीका केली. करण जोहरपासून हृतिक रोशन, सैफ अली खान सगळ्यांनाच तिने वेगवेगळ्या माध्यमांमधून खडे बोल सुनावले आहेत. तर राखी सावंत हिने आपले ज्ञान पाजळल्याने तीही गोत्यात आली. रामायण लिहिणारा वाल्मिकी हा खुनी होता, लुटारू होता या तिच्या विधानामुळे तिला अटक झाली आणि तुरुंगाची हवाही खावी लागली. विद्या बालनचंच उदाहरण घ्यायचं तर सध्या तिच्या हरएक विधानावरून उलटसुलट तर्कवितर्क केले जात आहेत. ‘कास्टिंग काऊच’बद्दल बोलताना तिने आपल्याला तसा कधीच अनुभव आला नाही हे स्पष्ट केलं. एवढंच नाही तर आपण नीट वागलो आणि आपल्या हेतूबद्दल ठाम असलो तर असे अनुभव कधीच येत नाहीत, असं म्हटलं होतं. विद्याचं हे मत समाजमाध्यमांवर सतत व्यक्त होणाऱ्या सोना मोहपात्रासारख्या गायिकेला रुचलं नाही. आणि तिने विद्याच्या विधानावरून प्रतिवाद सुरू केला. कलाकारांच्या या विधांनाना किंवा सहज बोलण्याला अर्थ असो वा नसो त्यातून वाद निर्माण करण्याचं एक अजब तंत्र समाजमाध्यमांसह वेगवेगळ्या माध्यमांना साध्य झालं आहे. यातून केवळ बोलाचेच वाद रंगतात.. हाती मात्र काहीच लागत नाही!