सध्या मणि रत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन २’ चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय, त्रिशा क्रिष्णन व कार्ती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. चित्रपटाच्या यशाचं सेलिब्रेशन केल्यानंतर दुसऱ्या चित्रपटाची रिहर्सल करणाऱ्या चियान विक्रमचा अपघात झाला असून तो जखमी झाला आहे.

विक्रमचा मॅनेजर युवराजने त्याच्या अधिकृत ट्विटरवर ‘थंगालन’ चित्रपटाच्या रिहर्सल दरम्यान चियान विक्रमला दुखापत झाली व त्याची बरगडी फ्रॅक्चर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्याच्या दुखापतीच्या बातमीने त्याचे चाहते चिंतेत आहेत. तो लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

चियान विक्रमच्या प्रकृतीच्या कारणास्तव ‘थंगालन’ चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. विक्रमचा मॅनेजर युवराजने ट्वीटमध्ये लिहिलं, “प्रेम आणि कौतुकासाठी सर्वांचे आभार. चियान विक्रमला दुखापत झाली आहे. रिहर्सल दरम्यान त्याची बरगडी तुटली आहे, ज्यामुळे तो काही दिवस त्याच्या थंगालन युनिटमध्ये सामील होऊ शकणार नाही. तुमच्या प्रेमाबद्दल तो तुम्हा सर्वांचा आभारी आहे आणि लवकरात लवकर तो शूटिंगवर परतेल.”

चियान विक्रम

‘पोन्नियिन सेल्वन-२’ चित्रपटाने आतापर्यंत १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मणि रत्नम यांनी या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि चियान विक्रम यांची जोडी पाहायला मिळाली. या दोघांशिवाय या चित्रपटात कार्ती, त्रिशा कृष्णन, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, विक्रम प्रभू, जयराम आणि प्रकाश राज सारखे दमदार कलाकार आहेत.