ऋषी कपूर यांनी त्यांच्या वडिलांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. पहिला राष्ट्रीय पुरस्कारही त्यांनी जिंकला होता. ऋषी कपूर यांनी एकामागून एक चित्रपटांमध्ये काम केले.
८० च्या दशकात राज कपूर ‘प्रेम रोग’ बनवत होते. या चित्रपटात ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे मुख्य भूमिकांत होते. ‘प्रेम रोग’ सिनेमात ऋषी आणि पद्मिनी यांच्यामध्ये एक सीन होता, ज्यात ऋषी कपूर यांना अभिनेत्री कानाखाली मारते, असे दाखविण्यात आले आहे. राज कपूर यांनी खरं तर अभिनेत्रीला त्यांच्या मुलाच्या जोरात कानाखाली मारायला लावली होती, जेणेकरून तो सीन खरे वाटेल. त्याबद्दल स्वतः अभिनेत्रीने खुलासा केला होता.
पद्मिनी कोल्हापुरे यांनी ऋषी कपूर यांना का मारली होती कानाखाली?
‘प्रेम रोग’, ‘प्रेम के काबिल’, ‘सडक छाप’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘विधाता’ अशा सिनेमांमधून बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झालेलं मराठमोळं नाव म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. एकदा हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पद्मिनी कोल्हापुरे यांनी ‘प्रेम रोग’ या चित्रपटाचा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या होत्या की, स्लॅप सीनसाठी राज कपूर यांना एक परफेक्ट शॉट हवा होता; परंतु तो शॉट त्यांना योग्य प्रकारे मिळत नव्हता. पद्मिनी म्हणाल्या, “ऋषी यांना त्यांच्याकडून खूप वेळा मार पडला. त्या सीननुसार अभिनेत्रीला ऋषी कपूर यांच्या कानाखाली मारायची होती. अभिनेत्रीने ऋषी यांना कानाखाली मारावी आणि ती खरी वाटावी, अशी राज कपूर यांची इच्छा होती”.
ऋषी यांनी वडिलांचं म्हणणं ऐकून अभिनेत्रीला कानाखाली मारण्यास सांगितलं. सीन करताना असं व्हायचं की, कानाखाली मारण्यासाठी पद्मिनी हात गालापर्यंत न्यायच्या आणि जवळ गेल्यावर त्यांचा वेग कमी व्हायचा; पण ती कानाखाली खरी वाटत नव्हती. त्यामुळे त्या सीनकरिता पद्मिनींनी असंख्य रीटेक केले. पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले, “त्यांनी परफेक्ट शॉट मिळवण्यासाठी ऋषी यांच्या ७-८ वेळा कानाखाली मारली होती. अनेक वेळा काही तांत्रिक समस्या असायची, कधी कॅमेऱ्याची समस्या, कधी लाईटची समस्या असे. त्यामुळे मला त्यांना ७-८ वेळा कानाखाली मारावी लागली होती”, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऋषी कपूर यांनी घेतला होता बदला…
अभिनेत्रीने असेही सांगितले की ऋषी यांनी तिला सांगितले होते की एक दिवस तो याचा बदला नक्की घेईल. मनोरंजक गोष्ट म्हणजे, जेव्हा दोन्ही स्टार ‘राही बदल गये’चे शूटिंग करत होते आणि त्या चित्रपटात एका सीनसाठी ऋषी यांना अभिनेत्रीला कानाखाली मारायची होती. तेव्हा त्यांचा बदला घेण्यासाठी ऋषी कपूर यांनी फक्त एका टेकमध्ये शॉट पूर्ण केला होता.