‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच पौराणिक गोष्टी लोकांच्या समोर आल्या. काही लोकांना त्या पटल्या नसल्या तरी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुराण आणि त्यातील कथा यांवर चर्चा व्हायला सुरुवात झाली. ‘ब्रह्मास्त्र’सारखाच एक आगळावेगळा प्रयोग अभिनेता शाहरुख खानने ‘रा.वन’ या चित्रपटाच्या माध्यमातून केला होता. ब्रह्मास्त्रप्रमाणेच त्या चित्रपटालाही लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शाहरुखने एका मुलाखतीमध्ये हिंदू पुराण आणि रामायण, महाभारत यावर भाष्य केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिनेअभ्यासक आणि तज्ञ तरण आदर्श यांनी या मुलाखतीमध्ये शाहरुखला भारतीय कॉमिक्स संदर्भात प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने सांगितलं की त्याने आजवरची सगळी कॉमिक्स वाचली आहेत. त्याला ती फार आवडली आहेत. यानंतर शाहरुखने आपल्या पौराणिक कथांमधील सुपरहिरोजविषयी भाष्यदेखील केलं.

आणखी वाचा : “तुझ्या स्तनाचा आकार…” प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला बॉलिवूडमध्ये काम करतानाचा ‘तो’ अनुभव

शाहरुख म्हणाला, “आपण आपल्या पौराणिक कथांकडे फार गांभीर्याने आणि भक्तिभावाने बघत. जे काहीअंशी योग्यदेखील आहे. त्यामुळे आधी या पौराणिक कथांवर चित्रपट बनवायला कोणाचं धाडस होत नसे. पण सध्याची नवीन पिढी ही या पौराणिक कथांमधल्या आपल्या देवी देवतांना सुपरहीरो म्हणून सादर करत आहे जे खूप कौतुकास्पद आहे. हिंदू पौराणिक कथा या जगभरात पसरल्या आहेत. पाश्चिमात्य चित्रपटातल्या सुपेरहिरोची मुळं आपल्या पुराणातच आहेत. अवतारसारखा चित्रपटही कृष्णाच्या तत्वज्ञानावर बेतलेला आहे.”

पुढे शाहरुख म्हणतो, “आपल्याकडील प्रत्येक देवी आणि देवता हे सुपरहिरो आहेत. त्यांच्याकडे दिव्यशक्ति, अस्त्र आहेत. आपल्याकडे आजवर या पौराणिक कथा उत्तमरीत्या सादर केलेल्या नाहीत. मला उद्या संधी मिळाली तर मी महाभारताला एक्स मेनसारखं नक्की सादर करेन. लोकं कदाचित माझ्यावर टीका करतील, मला बॅन करतील. पण आजच्या पिढीला या अजरामर पौराणिक गोष्टी, रामायण, महाभारतसारख्या कथा त्यांना आवडतील अशा पद्धतीने सांगणं ही आपली जबाबदारी आहे.”

शाहरुख नुकताच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत दिसला होता. यामध्येही शाहरुख एक सुपरहिरो म्हणूनच आपल्या समोर येतो. याबरोबरच पुढच्या वर्षी शाहरुखचे तब्बल ३ चित्रपट येणार आहेत. त्याच्या या जोरदार कमबॅकसाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When shahrukh khan confessed that he wanted to make mahabharat as big as x men series avn
First published on: 20-09-2022 at 18:23 IST